WTC IND vs AUS Final Highlights: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४४४ धावांच्या प्रचंड आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला झटपट पराभव पत्करावा लागला. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रोहित शर्मा (४३) आणि चेतेश्वर पुजारा (२७) यांनी विकेट्स स्वस्तात गमावल्या. शुबमन गिल नंतर रोहित, पुजारा ही जोडी चांगली पार्टनरशिप करून भारताच्या डावाची धुरा सांभाळत होती. रोहित सुद्धा सुरुवातीला काहीसा फॉर्ममध्ये दिसत असल्याने आयपीएलपासून मंदावलेली हिट मशीन आज चांगलीच फटकेबाजी करेल असे वाटत होते. पण नॅथन लियॉनच्या चेंडूवर स्वीप शॉट घेण्याचा प्रयत्न करताना अगदी शुल्लक चुकीमुळे बॉल त्याच्या पॅडला लागला आणि तो आउट झाला. पाठोपाठ पुजाराही रॅम्प शॉट प्रयोग करायला गेला आणि बाद झाला.
भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या बाद होण्यावरून टीका करत त्याला “लोभी” म्हटले आहे. “रोहित शर्माने आउट होण्याआधी या डावात काही चूक केली नाही. टी-20 आणि कसोटी सामना यांचा अजिबात संबंध नाही. त्याने आयपीएलमध्ये संघर्ष केला, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म उत्तम दिसत होता. तीन दर्जेदार फिरकीपटूंच्या समोर टिकून राहिल्यावर अचानक त्याला अति आत्मविश्वास आला असावा बॉल सरळ आला, काही विशेष नव्हते. कदाचित, एकाग्रता कमी झाली होती, धावांसाठी थोडी हाव होती म्हणूनच त्याने टी २० सारखा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला व तो बाद झाला, असे मांजरेकर यांनी ESPNCricinfo ला सांगितले.
रोहितच्या चुकीच्या निर्णयावर टीका करताना मांजरेकर यांनी त्याची विराट कोहलीशी सुद्धा तुलना केली. “कोहली एकदा क्रीझवर सेट झाला की गोलंदाजांना कधीही संधी देत नाही आणि त्यामुळे तो रोहितपेक्षा वेगळा आहे.काही फलंदाजांच्या बाबत एकाग्रता कमी होणे ही खरी समस्या आहे. पण विराट हा असा माणूस आहे ज्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या दोन डावात दोन शतके झळकावली. त्याला मोठी धावसंख्या कशी मिळवायची हे माहित आहे. अगदी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात, त्याने १०० आणि एक ८० धावा केल्या होत्या.”
“त्याने एकाग्रता गमावली नव्हती. रोहित शर्माच्या शैलीत फरक आहे, विराट कोहली सारखा खेळाडू फॉर्ममध्ये असताना गोलंदाजांना कधीच संधी देणार नाही, एकदा तो आत आला की तो मग खूप वेळ खेळणारच. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ शतके करणारा कोहलीच होता, असेही मांजरेकर म्हणाले.