WTC Final Scenario For India If They Lose Gabba Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे. पावसाने सातत्याने व्यत्यत आणलेल्या या सामन्यात फलंदाजी करताना भारताची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली आहे. ॲडलेडनंतर गाबामध्येही टीम इंडियावर पराभवाचे ढग दाटून आले आहेत. जर टीम इंडिया गाबामध्ये पराभूत झाली तर २०२३-२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाची स्थिती काय असेल आणि त्याच्या WTC फायनलसाठी काय समीकरणे असतील ते पाहूया.
भारताने गाबा कसोटी गमावली तर कसं असेल फायनलचं चित्र?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत फक्त दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, भारत आणि ऑस्ट्रेलिया उरले आहेत. सध्या दक्षिण आफ्रिका ६३.३३ टक्के गुणांसह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ६०.७१ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून टीम इंडिया ५७.२९ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर टीम इंडिया गाबा कसोटी हरली तर तिसऱ्या क्रमांकावर राहिल पण गुण मात्र कमी होतील.
टीम इंडियाने यानंतर मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे गुण ५८.८% आणि ऑस्ट्रेलियाचे गुण ५७% होतील. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर येईल. भारतीय संघाला इतर कोणत्याही संघावर अवलंबून न राहता थेट WTC फायनल २०२५ ची अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांना गाबा कसोटी जिंकावी लागेल आणि त्यानंतर मालिकेतील उर्वरित दोन सामनेही जिंकावे लागतील. पण सध्या पावसाची हजेरी आणि भारतीय संघाची अवस्था पाहता गाबा कसोटीत विजय मिळवणं शक्य नसणार आहे.
भारतासाठी WTC फायनलचं समीकरण
भारतीय संघाने जर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी १-३ किंवा १-४ ने गमावली तर ते WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. जर मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर टीम इंडियाला WTC मध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेला आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल.
श्रीलंकेला मायदेशात दोन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर निर्भेळ मालिका विजय मिळवावा लागणार आहे. याशिवाय आणखी एक समीकरण म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत जर ऑस्ट्रेलियाने ३-२ असा विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील दोन्ही कसोटी सामने गमवावे लागतील, तर टीम इंडियाला संधी मिळेल. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील किमान एक सामना अनिर्णित राहिला पाहिजे.