मुलतान कसोटीत पाकिस्तान संघाला इंग्लंडकडून (Pakistan vs England) २६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. एकवेळ यजमान सामना जिंकतील असे वाटत होते, पण जेम्स अँडरसन, मार्क वुड, ओली रॉबिन्सन या त्रिकुटाने पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. या पराभवामुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ २०२१-२३ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली बातमी आहे. इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर, पाकिस्तानला डिसेंबरच्या अखेरीस घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी चॅम्पियनशिपप्रमाणे ही शेजारील देशाची शेवटची मालिका असेल.
दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवता येणार नाही. कारण इंग्लंड आणि पाकिस्तान आधीच स्पर्धेबाहेर असल्याने, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची शर्यत भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ज्यामध्ये अव्वल दोन संघ फायनल सामन्यात एकमेकांशी भिडतील.
भारताची स्थिती कशी आहे?
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC पॉइंट टेबल) ७५ टक्के विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा ६० टक्के विजय असून ते या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ५२.०८ टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका आपल्यापुढे म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांचे ५३.३३ गुण आहेत. आजचा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लिश संघ एका स्थानाने पुढे जात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारत अंतिम फेरीत कसा पोहोचेल?
जून २०२३ मध्ये, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. त्याचवेळी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला कांगारू संघ भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही देशांदरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारताला टॉप-२ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी बांगलादेशलाच दोन्ही सामने पराभूत करावे लागणार नाहीत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही एकतर्फी विजय मिळवावा लागेल. रोहित अँड कंपनीला असे करता आले नाही, तर त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून अंतिम फेरीचा मार्ग शोधावा लागेल.