World Test Championship Points Table: भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीच्या दिशेने अजून एक मजबूत पाऊल टाकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आणखी एक कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने बांगलादेशचा २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव केला आहे. WTC 2023-25 सायकलमध्ये टीम इंडियाकडे अद्याप दोन कसोटी मालिका बाकी असतानाही, भारताने आपली स्थिती मजबूत करत पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. त्याचवेळी, कानपूर कसोटी सामन्यात ७ विकेट्सने पराभव केल्यामुळे बांगलादेश संघाला WTC गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया कानपूर कसोटीपूर्वीही पहिल्या क्रमांकावर होती आणि अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरूद्ध मालिका विजयानंतर भारताने पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलियामधील गुण आणि टक्केवारीतील अंतर जे कमी होते ते आता वाढले आहे. कानपूर कसोटीपूर्वी भारतीय संघाची गुणांची टक्केवारी ७१.६७ होता, जो आता हा सामना जिंकल्यानंतर थेट ७४.२४ वर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे गुणांची टक्केवारी फक्त ६२.५ आहे, कारण ऑस्ट्रेलियाने यादरम्यान एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ ३९.२९ टक्के विजयासह पाचव्या स्थानावर होता आणि आता तो सातव्या स्थानावर घसरला आहे. WTC 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ६२.५० आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे, ज्याने न्यूझीलंडला पराभूत करून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ४२.१९ आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर कसोटीत सलग दोन दिवस पाऊस पडत असताना, सामन्याचा निकाल लागेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाने आक्रमक कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पावसामुळे दोन दिवस एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्यात आला. अशा सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या दिवशी बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला.
© IE Online Media Services (P) Ltd