WTC Points Table Update After Gabba Test Drawn: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही संघांनी सामन्याचा निकाल कोणत्या तरी एका संघाच्या बाजूने लागेल असा खूप प्रयत्न केला. पण पाऊस आणि हवामानाने आपलं तेच खरं केलं आणि अखेरीस गाबा कसोटी अनिर्णित राहिली. आता गाबा कसोटी ड्रॉ राहिल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय बदल झाला आहे, जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात भारताच्या गोलंदाजीवर बाद झाले. टीम इंडिया फलंदाजीला येताच भारतीय टीम फक्त दोन षटकं फलंदाजी करू शकली. यानंतर पावसाला सुरूवात झाली. पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मुसळधार पावसामुळे काही वेळाने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
हेही वाचा – IND vs AUS: बुमराह-आकाशदीपची ऐतिहासिक भागीदारी, ७७ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने दक्षिण आफ्रिकेला सर्वाधिक फायदा झाला आहे. कारण हा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यांची टक्केवारी सध्या ६३.३३ आहे. सामना अनिर्णित राहिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी सध्या ६०.७१ आहे. तर भारतीय संघाची टक्केवारी ५७.२९ आहे. भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अजूनही भारतीय संघ WTC फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे. या मालिकेतील उरलेले दोन सामने खूप महत्त्वाचे असतील, कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कोणता संघ अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित करेल हे त्यावरून ठरेल.
तीन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत
तीन संघ विशेषत: अंतिम फेरीसाठी शर्यतीत आहेत. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत. दक्षिण आफ्रिकेचे दोन कसोटी सामने बाकी आहेत. हा संघ मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेने एकही सामना जिंकला तर त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. या मालिकेत टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने बाकी आहेत. भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर दोन्ही सामने जिंकणं आवश्यक असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्ध दोन सामने आहेत. दोन सामने खेळल्यानंतर संघ श्रीलंकेला जाईल आणि तिथे आणखी दोन कसोटी सामने खेळेल. हे दोन सामने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचे असणार आहेत.