WTC Points Table Update After India Defeat IND vs NZ Test: भारत वि न्यूझीलंडमध्ये बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत (WTC 2023-25) भारत अव्वल स्थानावर आहे. पण आता या पराभवानंतर भारताला मोठा फटका बसला असून टक्केवारीत घसरण झाली आहे. भारताने किवी संघाला १०७धावांचे लक्ष्य दिले होते आणि किवी संघाने २७.५ षटकांत ८ विकेट्स राखून ३६ वर्षांनी विजय मिळवला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. आता अंतिम फेरी गाठण्याचा मार्गही त्यांच्यासाठी कठीण झाला आहे.
न्यूझीलंडने १९८८ नंतर भारतात पहिला कसोटी विजय नोंदवला आहे. यासह, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील १२ कसोटींमध्ये भारताची टक्केवारी (पीसीटी) ७४.2२४ वरून ६८.०५ वर घसरली. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ६२.५ आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या विजयासह न्यूझीलंडने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत चालणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे हे तिसरे चक्र आहे. या तिसऱ्या चक्रात टीम इंडियाने आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान भारताने ८ सामने जिंकले आहेत तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी गमावल्यानंतर भारत WTC फायनलमध्ये कसा पोहोचणार?
भारताचे आता सात कसोटी सामने बाकी आहेत. न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच असे सात कसोटी सामने आता भारताला खेळायचे आहे. इतर निकालांची पर्वा न करता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला यापैकी पाच सामने जिंकावे लागतील. इतर निकाल भारताच्या बाजूने लागल्यास, भारत चार विजयांसह पुढील वर्षीच्या WTC अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो. म्हणजेच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताचा मार्ग सोपा असणार नाही.
२४ ऑक्टोबरपासून पुण्यात भारताचा दुसरा कसोटी सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तिसरा कसोटी सामना १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पिंक बॉल टेस्टसह पाच कसोटी सामने खेळायचे आहेत.

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ती पहिल्या डावात ४६ धावांत ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. त्याचवेळी टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४६२ धावा केल्या. अशा स्थितीत टीम इंडियाने या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या २ गडी गमावून पूर्ण केले आणि ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.