WTC Points Table 2023-25: भारतीय संघाने २०२४ मधील घरच्या मैदानावरील हंगामाची दणक्यात सुरूवात केली आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०३-२५ अंतर्गत खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. चेन्नई कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. धावांच्या बाबतीत बांगलादेशविरुद्धचा भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. या विजयामुळे टीम इंडियाला डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे, तर बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव करत मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईच्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विननेही सामन्यात शतकासह सहा विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या आणि दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला. अशाप्रकारे बांगलादेशला तिसऱ्या दिवशी ५१५ धावांचे कठीण लक्ष्य मिळाले, त्याच्या प्रत्युत्तरात बांगला टायगर्स चौथ्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी २३४ धावांवर सर्वबाद झाले. बांगलादेशने चार विकेट्सवर १५८ धावांसह दिवसाची सुरुवात केली परंतु पहिल्या सत्रात ७६ धावांची भर घालत उर्वरित सहा विकेट गमावल्या.
टीम इंडियाने घरच्या भूमीवर सलग पाचवा कसोटी सामना जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती आणि आता या विजयासह संघाने भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ ६८.५२ टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता आणि अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र भारताची टक्केवारी आता ७१.६७ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ ५० टक्क्यां तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत अधिक बदल होऊ शकतो.
बांगलादेशचा संघ या सामन्यापूर्वी ४५.८३ टक्केवारीसह चौथ्या स्थानावर होता, पण आता ३९.२८ टक्के गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या विजयाचा आणि बांगलादेशच्या पराभवाचा फायदा श्रीलंका आणि इंग्लंडला झाला आहे. श्रीलंकेचा संघ ४२.८६ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर असून त्यांच्या खात्यात ४२.१९ टक्के आहे. सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (३८.८९), आठव्या क्रमांकावर पाकिस्तान (१९.०५) आणि शेवटच्या म्हणजे नवव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज (१८.५२) आहे.