WTC Points Table Scenario After New Zealand Beat India by 114 Runs: न्यूझीलंड संघाने मोठा इतिहास घडवत पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली. न्यूझीलंड संघाने ११२ धावांनी पुणे कसोटी भारताचा दारूण पराभव केला आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघ दुसऱ्या डावात संपूर्ण एक दिवसही फलंदाजी करू शकला नाही आणि परिणामी भारताला मोठ्या मालिका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय संघाने १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर कसोटी मालिका गमावली आहे. पण याचा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर काय परिणाम झाला आहे, जाणून घेऊया.
भारत सध्या १२ सामन्यांनंतर ६८.०६ टक्के गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) क्रमवारीत अव्वल स्थानी होता. ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५५.५६ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र, बंगळुरूनंतर आता पुण्यातील निराशाजनक पराभवानंतर अंतिम फेरीचा मार्ग थोडा आव्हानात्मक बनला आहे. भारतीय संघाला या पराभवानंतर टक्केवारीत फटका बसला आहे. भारताची टक्केवारी आता ६२.८२ वर घसरली आहे. जे ऑस्ट्रेलियाच्या टक्केवारीच्या फारच जवळ आहे. जर भारताने आपली कामगिरी सुधारली नाहीतर त्यांना गुणतालिकेतील पहिले स्थान गमवावे लागेल.
हेही वाचा – Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कसोटीत घडवला नवा इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टक्केवारीत काही अंकांचा फरक तर आहेच, पण त्याचबरोबर भारतीय संघाचे पॉईंट्स ९८ आहेत. ज्यामुळे भारतीय संघ पहिल्या स्थानी आहे. पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला तर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत भारताच्या पुढे जाऊ शकतो. न्यूझीलंड संघाने सलग दोन कसोटी सामने जिंकल्याने त्यांना गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंडचा संघ आता चौथ्या स्थानी पोहाचला असून त्यांची टक्केवारी ५५.५६ टक्के झाली आहे आणि अंतिम फेरीसाठी पुन्हा एकदा भक्कम दावेदार असल्याचे दाखवून दिले.
भारताला इतर संघांच्या समीकरणावर अवलंबून न राहता आता पुढील ६ कसोटी सामन्यांपैकी ४ सामने संघाला जिंकावे लागतील तर एक सामना ड्रॉ करावा लागेल. पुणे कसोटीनंतर भारताला किवी संघाविरुद्ध एक कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकावा लागेल आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभवही करावा लागेल. तसे झाले नाही तर भारताला अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते.
भारतीय संघ जर पुढील ६ सामन्यात ४ सामने जिंकण्यात अपयशी ठरला तर इतर संघांच्या मालिकेतील अनुकूल निकालांवर अवलंबून राहावे लागेल. उदाहरणार्थ, या WTC सायकलमध्ये श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्ध खेळणार आहे आणि त्या निकालांचा थेट परिणाम भारताच्या सलग WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांवर होईल.