WTC Points Table Updates After IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा १० विकेट्स राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या कसोटी पराभवासह भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणातालिकेत आजवरचा मोठा धक्का बसला आहे. भारताच्या पराभवाचं मोठं कारण म्हणजे भारताचे सर्व दोन्ही डावात फलंदाज फेल ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली., यशस्वी जैस्वाल, केएल राहुल असे एकापेक्षा एक फलंदाज असताना भारत दोन्ही डावात २०० धावाही करू शकला नाही.
भारतीय संघाने पहिल्या डावात १८० धावा तर दुसऱ्या डावात केवळ १७५ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ १९ धावांचे लक्ष्य दिले, जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.
ऑस्ट्रेलिया पुन्हा पहिल्या क्रमांकावर
भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण १४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत आणि त्यांची टक्केवारी ६०.७१ आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. भारताची टक्केवारी आता ५७.२९ टक्क्यांवर घसरली आहे.
हेही वाचा – IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाईल. गुणतालिकेत अव्वल-२ मध्ये स्थान मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. टीम इंडियाकडे अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत.
गुलाबी चेंडूच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत, ३ गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.आफ्रिकेची टक्केवारी ५९.२५ आहे जी भारतापेक्षा थोडी जास्त आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामने जिंकणारा इंग्लंडचा संघ ५व्या स्थानावर असून, आतापर्यंत २१ पैकी ११ सामने जिंकले आहेत, ८ गमावले आहेत आणि एक अनिर्णित सामना राहिला आहे. इंग्लंडची टक्केवारी ४५.२४ आहे. तर चौथ्या स्थानी श्रीलंकेचा संघ आहे.