Sri Lanka Beat New Zealand by 154 Runs and an Innings SL vs NZ 2nd Test: श्रीलंका वि न्यूझीलंड कसोटी मालिकेत श्रीलंकेच्या संघाने मोठी बाजी मारली आहे. श्रीलंकेच्या संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करून दमदार कामगिरी केली. श्रीलंकेने २ कसोटी सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. श्रीलंकेच्या विजयाने आता ऑस्ट्रेलियावरील दडपण वाढवले आहे.
न्यूझीलंड संघाला श्रीलंकेकडून दुसऱ्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६०२ धावा केल्या. तर न्यूझीलंडला ६०३ धावांच्या प्रत्युत्तरात १०० धावाही करता आल्या नाहीत आणि संघ ८८ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर न्यूझीलंड संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली आणि श्रीलंकेने त्यांना फॉलोऑन दिला. यावेळेस मात्र न्यूझीलंडने कडवी झुंज दिली पण लक्ष्य डोंगराएवढे मोठे असल्याने किवी संघ गाठू शकला नाही. सर्वच फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत ऑल आऊट होईपर्यंत ३६० धावांची मजल मारली. पण श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीपुढे संघ लक्ष्य गाठू शकला नाही.
गॉल येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने एक डाव आणि १५४ धावांनी सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे आणि अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतही त्यांचा समावेश झाला आहे. श्रीलंकेचा संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्याच्या गुणांची टक्केवारी ५५.५५ आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघापेक्षा थोडा मागे आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी ६२.५ आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, किवी संघ ४२.८५ गुणांच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. आता या सामन्यातील पराभवानंतर तो थेट ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याच्या गुणांची टक्केवारी आता ३७.५ झाली आहे. सध्या, न्यूझीलंड संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या तिसऱ्या आवृत्तीत भारत आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांविरूद्ध ३-३ सामने खेळायचे आहेत.
WTC Points Table मध्ये ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा
श्रीलंकेच्या संघाला अजूनही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे कांगारू संघासाठी अंतिम फेरीचा मार्ग निश्चितच कठीण दिसत आहे, कारण त्यांना श्रीलंकेत जाऊन त्यांच्याविरुद्ध ही कसोटी मालिका खेळायची आहे. जरी ऑस्ट्रेलियन संघ सध्या जागतिक कसोटी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असला तरी श्रीलंका गुणांच्या तुलनेत नक्कीच त्यांच्या खूप जवळ आला आहे. तर सध्या भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे ज्यामध्ये त्याच्या गुणांची टक्केवारी ७१.६७ आहे.