एपी, मेलबर्न

अमेरिकन स्पर्धेत एकदा आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सलग दोन वेळा विजेतेपद मिळाल्यानंतरही यानिक सिन्नेरने ग्रास आणि क्लो कोर्ट या अन्य पृष्ठभागांवरही यश मिळविल्यावरच मी परिपूर्ण टेनिसपटू ठरेन, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आणि स्पर्धेत अग्रमानांकन असणाऱ्या सिन्नेरने रविवारी दुसऱ्या मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेवचा ६-५, ७-६ (७-४), ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. चारच महिन्यांपूर्वी त्याने अमेरिकन स्पर्धाही जिंकली होती. तेव्हापासून सिन्नेरला हार्डकोर्टवरील सर्वात आव्हानात्मक खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले.

विजयानंतर सिन्नेरने यशाबद्दल आनंद व्यक्त केला, पण त्याच वेळी आपल्यातला टेनिसपटू अद्याप परिपूर्ण नाही. एका पृष्ठभागावर वर्चस्व राखून चालत नाही, अन्य पृष्ठभागांवरही आपल्याला यश मिळेल, तेव्हा माझ्यातील टेनिसपटू परिपूर्ण होईल, असे सिन्नेर म्हणाला. सिन्नेरने गेल्या दोन हंगामांत विम्बल्डन आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र प्रत्येक वेळेस त्याला तेथेच पराभवाचा सामना करावा लागला. ‘‘ग्रास आणि क्ले कोर्टवर गेले वर्ष माझ्यासाठी खूप काही वाईट ठरले नाही. मी यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकतो. पण याचे उत्तर मला माझ्या खेळातूनच द्यावे लागेल,’’ असे सिन्नेरने सांगितले.

कारकीर्दीत पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून वंचित राहिल्यावर अॅलेक्झांडर झ्वेरेव खरे तर, दु:खी होता. पण त्याने सिन्नेरच्या वर्चस्वपूर्ण खेळाचे कौतुक केले. ‘‘जोकोविच जेव्हा त्याचा सर्वोत्तम खेळ करत असतो, तेव्हा त्याला रोखणे आवाक्याबाहेरचे असते. असाच खेळ सिन्नेरचा आहे. मला त्यात जोकोविचच्या शैलीचा भास होतो. बेसलाइनवरून सफाईदार चेंडू मारणे, लयबद्ध हालचाल आणि प्रतिस्पर्धी चेंडू कुठे खेळतो हे समजून खेळ करणे, हे जोकोविचचे वैशिष्ट्य आहे आणि सिन्नेर अगदी तसाच खेळतो,’’ असे झ्वेरेव म्हणाला.

उत्तेजक सेवन प्रकरणाचे आरोप दु:खद आहेत. त्याचे वर्णन करणे कठीण आहे. कोर्टबाहेर बऱ्याच गोष्टी घडतात. कधी कधी वेळ अशी येते की अशा गोष्टी रोखणे खूप कठीण असते. यानंतरही माझ्यावर विश्वास ठेवणारे संघ व्यवस्थापन असल्यामुळे मी खेळू शकतो. यानिक सिन्नेर