India vs West Indies 4th T20 Match Updates : टीम इंडियाने शनिवारी वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात मोठा विजय मिळवला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या १७ षटकांत विजय मिळवला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (८४*) आणि शुबमन गिलच्या (७७) तुफानी फलंदाजीने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १५.३ षटकांत १६५ धावांची भागीदारी केली. यासह दोन्ही फलंदाजांनी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
जैस्वाल आणि गिलने मोडला रोहित-धवनचा विक्रम –
यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात मोठी भागीदारी करणारी तिसरी भारतीय जोडी ठरली. त्याच वेळी, सलामीच्या जोडीच्या बाबतीत, त्यांनी केएल राहुल आणि रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली. पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीच्या बाबतीत त्याने शिखर धवन आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला. रोहित आणि धवन यांनी २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली होती. दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांच्या नावावर भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आहे. या दोन्ही फलंदाजांनी गेल्या वर्षी आयर्लंडविरुद्ध १७६ धावा केल्या होत्या. ही दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली होती.
टी-२० मध्ये भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी –
१७६ दीपक हुडा – संजू सॅमसन विरुद्ध आयर्लंड, मलाहाइड २०२२
१६५ केएल राहुल – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर २०१७
१६५ शुबमन गिल – यशस्वी जैस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉडरहिल २०२३
१६० शिखर धवन – रोहित शर्मा विरुद्ध आयर्लंड, मालाहाइड २०१८
यासह यशस्वी जैस्वालने आणखी एका विक्रमाची नोंद केली. भारतासाठी टी-२० मध्ये अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. जैस्वालने वयाच्या २१ वर्षे २२७ दिवसात ही कामगिरी केली. जैस्वालला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.
हेही वाचा – असामान्य क्रिकेटपटूमधील ‘साध्या माणसा’शी संवाद; बुधवारी ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये अजिंक्य रहाणे
टी-२० मध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू –
२० वर्षे १४३ दिवस रोहित शर्मा (५०* विरुद्ध दक्षिण आफ्रिका डर्बन २००७)
२० वर्षे २७१ दिवस तिलक वर्मा (५१ विरुद्ध वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स २०२३)
२१ वर्षे ३८ दिवस ऋषभ पंत (५८ विरुद्ध चेन्नई २०१८)
२१ वर्षे २२७ दिवस यशस्वी जैस्वाल (८४* विरुद्ध वेस्ट इंडीज लॉडरहिल २०२३)