Yashasvi Jaiswal Record with 16 Runs in First Over IND vs AUS: भारतीय संघ सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १४५ धावांच्या आघाडीसह पुढे आहे. तर भारताने ६ विकेट्स गमावले आहेत. सिडनी कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. भारताच्या टॉप ऑर्डरने मोठी धावसंख्या उभारली नसली तरी सुरूवात मात्र दणक्यात केली. यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कच्या पहिल्यात षटकात ४ चौकार लगावत १६ धावा केल्या. यासह त्याने मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १८१ धावांत गुंडाळल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली. मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक टाकण्यासाठी आला, ज्यामध्ये यशस्वी जैस्वालने चौकारांचा पाऊस पाडला. पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता जैस्वालने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरही चौकार मारले. ५व्या चेंडूवर एकही धाव आली नाही पण जैस्वालने चौकार मारून षटकाचा शेवट केला. अशा प्रकारे जैस्वालने डावाच्या पहिल्याच षटकात ४ चौकारांच्या मदतीने १६ धावा करत इतिहास घडवला.
हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे चौथ्यांदा घडले जेव्हा एखाद्या फलंदाजाने डावाच्या पहिल्याच षटकात १६ धावा करण्याचा महान पराक्रम केला. इतकेच नाही तर भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळाले. याआधी मायकेल स्लेटर, ख्रिस गेल आणि ओशादा फर्नांडो यांनी कसोटीत एका डावाच्या पहिल्याच षटकात १६ धावा करण्याची कामगिरी केली होती.
कसोटीत एका डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१६ धावा – यशस्वी जैस्वाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, २०२५
१६ धावा – मायकेल स्लेटर विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २००१
१६ धावा – ख्रिस गेल विरुद्ध न्यूझीलंड, अँटिग्वा, २०१२
१६ धावा – ओशादा फर्नांडो विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०२२
कसोटीत डावाच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
१६ धावा – यशस्वी जैस्वाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, २०२५
१३ धावा – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपूर, २०२३
१३ धावा – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, कोलकाता, २००५