Yashasvi Jaiswal helmet getting hit by Jack Nisbet a ball : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना ६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूने खेळवला जाणारा हा दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हल क्रिकेट मैदानावर होणार आहे. टीम इंडियाने या कसोटीसाठी चांगली तयारी करताना ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन विरुद्धचा सराव सामना ६ गडी राखून जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन संघ अवघ्या २४० धावांवर गारद झाला. यानंतर शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या आणि यशस्वी जैस्वालच्या ४५ धावांच्या जोरावर भारताने सामना सहज जिंकला. पण या सामन्यात एक घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी जैस्वालला हेल्मेटवर आदळला वेगवान चेंडू –

डावातील सहावे षटक ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनसाठी जॅक निस्बेटने टाकले. त्यावेळी भारताकडून यशस्वी जैस्वाल फलंदाजी करत होता. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर, तिसरा चेंडू डॉट राहिला आणि नंतर गोलंदाज निस्बेटने चौथा चेंडू टाकला जो बाऊंसर होता. चेंडूचा वेग जास्त होता आणि जैस्वालला त्याचा अंदाज घेता आला नाही. त्याचा तोल गेला आणि चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. यानंतर जॅक निस्बेट काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. मात्र, जैस्वालला कोणतीही दुखापत न झाल्याने तो पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज झाला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन विरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने ५९ चेंडू खेळून एकूण ४५ धावा केल्या, ज्यात ९ चौकारांचा समावेश होता. जैस्वाल काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि टीम इंडियासाठी खूप धावा करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने १६१ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा – Jayden Seales : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाची कमाल! ९५ चेंडूत फक्त ५ धावा देत मोडला उमेश यादवचा मोठा विक्रम

u

गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात हर्षित राणाने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने शानदार गोलंदाज करताना अवघ्या ६ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या. हर्षित व्यतिरिक्त आकाश दीपने दोन गडी बाद केले. फलंदाजीत यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त दुखापतीतून सावरल्यानंतर परतलेल्या शुबमन गिलने प्रभावित केले. त्याने ५० धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी ४२-४२ धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे टीम इंडियाने ४६ षटकांत ४ बाद करत २५७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal helmet getting hit by jack nisbet a ball video goes viral during indv vs aus pm xi match vbm