Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Dispute: आयपीएलचा माहोल सगळीकडे असताना भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यशस्वी जैस्वालने डॉमेस्टिक क्रिकेटमधील चॅम्पियन संघ मुंबईची साथ सोडली असून आता तो गोवा क्रिकेट संघाकडून खेळताना दिसणार आहे. गोवा क्रिकेट संघाने त्याला कर्णधारपदाची मोठी ऑफर दिली आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक रिपोर्ट आता समोर आला आहे.
यशस्वी जैस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनला ना हरकत प्रमाण पत्रासाठी अर्ज केला होता की, येता हंगाम म्हणजेच २०२-२६ च्या एलिट ग्रुप सामन्यांमध्ये तो गोवाकडून खेळणार आहे. यशस्वी जैस्वालने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुंबई सोडून जाण्यामागचे कारण स्पष्ट केले होते. त्यामुळे हे चित्र स्पष्ट झाले होते. पण एका रिपोर्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांच्यातील वादाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मुख्यत: संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जैस्वालमध्ये मतभेद असल्याचे म्हटले आहे. या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, जैस्वालने रागाच्या भरात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या किट बॅगला लाथडलं होतं. ही घटना बीकेसीच्या मैदानावर झालेल्या जम्मू काश्मीर वि. मुंबई या सामन्यात घडली होती.
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईला जम्मू आणि काश्मीरकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता, ज्यात जैस्वाल पूर्णपणे अपयशी ठरला होता. या सामन्यादरम्यान जैस्वालने अजिंक्य रहाणेच्या किटला लाथ मारली होती. त्यामुळे रहाणे चांगलाच संतापला. या पराभवासाठी रहाणे आणि प्रशिक्षक ओंकार साळवी यांनी जैस्वालला लक्ष्य केलाचा दावा रिपोर्टमध्ये केला जात आहे. या दोघांनी जैस्वालच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे यशस्वी संतापला होता.
अजिंक्य रहाणे-यशस्वी जैस्वाल वाद नेमका काय आहे?
रहाणे आणि जैस्वाल यांच्यातील हा वाद काही पहिल्यांदाच झाला नव्हता. यापूर्वी २०२२ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये रहाणेने यशस्वीला संघाबाहेर केले होते. २०२२ साली दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना होता. पश्चिम विभागाचा कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे अचानक चांगलाच संतापला, कारण क्षेत्ररक्षण करत असलेला यशस्वी जैस्वाल विरोधी फलंदाज रवी तेजाला स्लेज करत होता. रहाणेने जैस्वालला स्लेजिंग करताना पाहिले तेव्हा त्याने खेळाडूला मैदान सोडण्यास सांगितले.
जैस्वालने कर्णधाराची आज्ञा पाळली आणि त्याने मैदान सोडले. गेल्या वर्षी रहाणेला एका मुलाखतीत या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, मैदानावर हा खेळ सभ्यतेने खेळला जावा आणि जैस्वालने ती मर्यादा ओलांडली होती. यासाठी जैस्वालला निलंबित करण्यात आले असते, त्यामुळे मोठी कारवाई होण्यापेक्षा स्वत: रहाणेने या खेळाडूला शिक्षा केली. अहवालात असेही म्हटले आहे की, भारताच्या कसोटी संघात सलामीवीर म्हणून त्याने आपले स्थान पक्के केल्यानंतर गेल्या काही वर्षांत मुंबईसाठी त्याच्या मर्यादित कामगिरीबद्दल सतत होत असलेल्या चर्चेमुळे त्याने हा निर्णय घेतला.
बीसीसीआयने सर्व केंद्रीय करारबद्ध भारतीय क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केल्यानंतर जैस्वाल आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी रणजी ट्रॉफीतील जम्मू-काश्मीरच्या एका महत्त्वाच्या गट सामन्यासाठी संघात सहभागी झाले होते. त्या सामन्यात, जैस्वाल दोन्ही डावात धावा करू शकला नाही आणि मुंबईला जम्मू-काश्मीरकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
अखेरीस मुंबईने उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. विदर्भाविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या दिवशी जैस्वाल संघ सोडून मायदेशी परतल्याचे वृत्त आहे. मुंबईचा पराभव झाल्यानंतर, मुख्य निवडकर्ता संजय पाटील यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली: “जेव्हा जेव्हा सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळायला लावले गेले तेव्हा त्यांनी सहभागी होण्याऐवजी फक्त या खेळांमध्ये भाग घेतात. मुंबई क्रिकेटचा वारसा, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्टार्स जे मुंबई क्रिकेट संघात दाखल होतात ते खेळात पूर्णपणे सहभागी होत नाहीत आणि हे दुरुस्त करणं आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पोर्टस्टारला सांगितले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जैस्वाल आणि मुंबई संघ व्यवस्थापनाच्या अस्थिर संबंधांमधील हे विधान अधिक फूट पाडणार ठरलं.