टीम इंडियाचा तरुण तडफदार धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल ज्याने मुंबई संघाकडून डॉमेस्टिक क्रिकेट खेळताना दिसला आहे. यशस्वीने आता मुंबई संघाला रामराम देण्याचा निर्णय घेतला. आगामी डोमेस्टिक हंगामात यशस्वी गोव्याकडून खेळताना दिसणार आहे. यशस्वीने यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला इमेल केला. यशस्वीच्या निर्णयाने एमसीएचे पदाधिकारी आश्चर्यचकित झाले पण त्यांनी त्याला ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे. पण यशस्वीने मुंबईऐवजी गोवा संघाकडून खेळण्याचा मोठा निर्णय का घेतला याचं उत्तर दिलं आहे.
यशस्वी जैस्वालने बुधवारी आपल्या या मोठ्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. जैस्वालने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “माझ्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. आज मी जे काही आहे ते मुंबईमुळेच. या शहराने मी मला बनवलं आहे आणि मी आयुष्यभर एमसीएचा ऋणी राहीन.”
यशस्वी जैस्वालने का सोडली मुंबई संघाची साथ? काय आहे कारण
पुढे यशस्वी जैस्वाल म्हणाला, “गोवा संघाने मला नवीन संधी दिली आहे आणि त्यांनी मला नेतृत्व करण्याची भूमिका दिली आहे. माझे पहिले लक्ष्य भारतासाठी चांगली कामगिरी करणं हे असेल आणि जेव्हा मी राष्ट्रीय संघात नसेन तेव्हा मी गोव्यासाठी खेळेन आणि त्यांना स्पर्धेत पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.
२३ वर्षांच्या असलेल्या जैस्वालसाठी ही एक मोठी संधी असेल, विशेष म्हणजे गोवा नुकताच बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. यशस्वीदेखील अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड सारख्या खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. या दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. जैस्वाल वयाच्या ११ व्या वर्षी उत्तर प्रदेशातील सुरियावन येथून मुंबईला स्थलांतरित झाला होता आणि त्याचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये जैस्वालने लिहिले होते की, त्याला डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे आणि असोसिएशनने दिलेल्या संधींचा त्याला खूप फायदा झाला आहे. दरम्यान, त्याच्या कारकिर्दीच्या आकांक्षा आणि वैयक्तिक परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये यशस्वीने ३६ प्रथम श्रेणी सामन्यात मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. ६०.८५च्या सरासरीने त्याने ३७१२ धावा केल्या आहेत. २०१९ मध्ये त्याने मुंबईसाठी पदार्पण केलं होतं. उत्तर प्रदेशातल्या भदोही इथून मुंबईला येऊन आझाद मैदानाजवळच्या तंबूत राहून यशस्वीने क्रिकेटची आवड जोपासली होती. फावल्या वेळात पाणीपुरीच्या गाडीवरही त्याने काम केलं होतं. परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वीने दमदार वाटचाल केली आहे.