Yashasvi Jaiswal Sledges Mitchell Starc Video: भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर यशस्वीने दुसऱ्या डावात संयमाने फलंदाजी केली आणि हळूहळू डाव पुढे नेला. यासह भारतीय संघाने १५० अधिक धावांची आघाडी मिळवली आहे. या सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वाल ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कला स्लेजिंग करताना दिसला पण आपल्या फलंदाजीवरही त्याने लक्ष केंद्रित केलं.
यशस्वी जैस्वालने ३८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. जैस्वालचे यंदाचे हे १०वे अर्धशतक आहे. जैस्वालने ५० धावा करण्यासाठी १२३ चेंडू खेळला. जैस्वालच्या कारकिर्दीतील हे सर्वात संथ अर्धशतक असले तरी त्याचे महत्त्व खूप जास्त आहे. जैस्वालने आपल्या बचावात्मक फलंदाजीने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांवर दबाव टाकला आणि नंतर आपल्या शानदार फटकेबाजीने संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या.
हेही वाचा – Tilak Varma: तिलक वर्माची टी-२० मध्ये शतकांची हॅटट्रिक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
दुसऱ्या डावात जैस्वाल आणि स्टार्क यांच्यात शाब्दिक चकमक झाली एवढंच नाही तर जैस्वालने आत्मविश्वास दाखवत स्टार्कवर शब्दांचे बाण सोडले. खरं तर झालं असं की, स्टार्कच्या चेंडूला सामोरे जात असताना जैस्वालने स्टार्कला स्लेज केलं, म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध खूप संथ गोलंदाजी करत आहेस.” हे ऐकून स्टार्क हसायला लागतो. दोघांमधील या संवादचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डावाच्या सुरुवातीला बचावात्मक खेळताना जैस्वालने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खूप त्रास दिला. त्यानंतर सेट झाल्यावर निर्भयपणे खेळत त्याने स्टार्कला मिडविकेटवर चौकार मारले. सामन्यादरम्यान स्टार्क सतत बाऊन्सरने आक्रमण करत होता. तेव्हा जैस्वालने त्याला स्लेज केलं.
भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजीला सुरूवात केली असून यशस्वी जैस्वालने अर्धशतक केले आहे. तर केएल राहुलही अर्धशतकाच्या जवळ आहे.या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे आता भारतीय संघाने पहिल्या कसोटीत महत्त्वपूर्ण अशी १६० धावांची आघाडी घेतली आहे. भारताने लंच ब्रेकनंतर एकही विकेट न गमावता महत्त्वपूर्ण धावसंख्या उभारली आहे.