IND vs ENG 1st ODI Updates in Marathi: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडेमध्ये पदार्पण केलेल्या दोन्ही पदार्पणवीरांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करणारा इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या करण्याच्या तयारीत होता. पण टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा या दोन खेळाडूंनी त्यांच्या या योजनेवर पाणी फेरलं. हर्षितच्या चेंडूवर यशस्वीने असा झेल घेतला की सामना भारताच्या दिशेने फिरला.

फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी इंग्लंडच्या डावाची दमदार सुरुवात केली होती. दोन्ही सलामीवीर वेगाने धावा करताना दिसले. पण नंतर नंतर दोघांमधील ताळमेळ नीट नसल्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला आणि परिणामी फिल सॉल्ट धावबाद झाला. मात्र, बेन डकेटच्या रूपाने एक सेट झालेला फलंदाज अजूनही क्रीजवर उभा होता. पण बेन डकेटला तंबूत परत पाठवण्याचे काम भारताच्या पदार्पणवीरांनी केले.

इंग्लंडच्या डावातील दहावे षटक टाकण्याची जबाबदारी पुन्हा हर्षितकडे सोपवली होती. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन डकेट मोठा फटका मारण्यासाठी गेला पण चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि हवेत उंच उडाला. यशस्वी जैस्वालने झेल टिपण्यासाठी चेंडूच्या दिशेने मागे धावत गेला आणि डाईव्ह घेत एक जबरदस्त झेल टिपला आणि इंग्लंडला अजून एक धक्का दिला.

यशस्वी जैस्वालसह वनडे पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने आतापर्यंतच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने एकाच षटकात दोन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हर्षितने आधी बेन डकेटला आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर त्याने हॅरी ब्रुकला खातेही न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, सॉल्टने हर्षितची चांगलीच धुलाई केली आणि त्याच्या एका षटकात २६ धावा केल्या. सॉल्टने या षटकात हर्षितविरुद्ध तीन गगनचुंबी षटकार आणि दोन चौकार लगावले.

पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:

बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

Story img Loader