‘‘दोहा आशियाई स्पर्धेच्या नऊ दिवसांपूर्वी माझ्या बाबांचे निधन झाले, त्यांचा मला चांगला पांठिबा होता आणि या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकावे, अशी त्यांची इच्छा होती. या स्पर्धेत मला सुवर्ण मिळवता आले नाही, कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण या वेळी जेव्हा सुवर्णपदक जिंकले आणि पदक मिळाले तेव्हा राष्ट्रगीताबरोबर तिरंगा उंचावत जात असताना मला त्यामध्ये बाबा दिसले, त्यांच्याबरोबर देशाचे २८ वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा आनंद आणि अभिमान मला आहे,’’ असे भावुक झालेला कुस्तीपटू योगेश्वर दत्त सांगत होता.
करतार सिंग यांच्यानंतर भारताला कुस्तीमध्ये गेल्या २८ वर्षांमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. पण योगेश्वरने इन्चॉनमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत हा दुष्काळ संपवला.
‘‘ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकांनी आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे स्पर्धेला जाण्यापूर्वी सुवर्ण जिंकायचेच हे मनाशी पक्के केले होते, तसे मी वचनही दिले होते. देशवासीयांना माझ्याकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या, याची जाणीवही होती. त्यामुळे स्पर्धेमध्ये प्रत्येक लढतीपूर्वी दडपण असायचे, पण त्या दडपणाचा मला फायदाच झाला. प्रत्येक वेळी घरच्यांचा आणि देशवासीयांचा विचार मनात यायचा आणि मला ऊर्जा मिळायची. वचन पूर्ण केल्याचा आनंद गगनात मावेनासा होता. पदक मिळाल्यावर मी भावुक झालो होतो. देशाचे नाव मी उंचावू शकलो, तिरंगा फडकवू शकलो, याचा आनंद होता. आता भारताकडे सुवर्णपदकांचा ओघ सुरू होईल. कुस्ती विश्वामध्ये भारताचे वजन वाढले आहे आणि यापुढे भारत आपली मक्तेदारी दाखवून देईल.’’ असे योगेश्वर सांगत होता.
सुवर्णपदक जिंकल्यावर योगेश्वरने घरी दूरध्वनी करून संपर्क साधला. याबद्दल योगेश्वर म्हणाला की, ‘‘पदक जिंकल्यावर आईशी बोलताना भरून आले होते. दोघांनाही बाबांची आठवण झाली. ‘लवकर घरी ये. तुला बघायची आस लागली आहे’, असे ती म्हणाली. त्याचबरोबर सुवर्णपदक डोळ्यामध्ये साठवून ठेवायचे असल्याचेही तिने सांगितले.’’
यापुढील ध्येयांबद्दल बोलताना योगेश्वर म्हणाला की, ‘‘आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे, ती जिंकल्यावर ऑलिम्पिकसाठी मी पात्र ठरू शकेन. त्यामुळे सध्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद हे लक्ष्य असले तरी मला ऑलिम्पिक सुवर्णपदक देशाला मिळवून द्यायचे आहे.’’

Story img Loader