वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पॅरिसमध्ये भारतीय संघात महिला कुस्तीगीरांची संख्या अधिक असली, तरी या वेळीही कुस्तीतील ऑलिम्पिक पदकांची मालिका कायम राहील, असा विश्वास लंडन ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या योगेश्वर दत्तने व्यक्त केला.

अमन सेहरावत (५७ किलो वजनी गट) हा एकमेव भारतीय पुरुष मल्ल आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला विभागात मात्र ऑलिम्पिकच्या सहा वजनी गटांपैकी पाचमध्ये भारताच्या कुस्तीगीर सहभाग नोंदवणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत विनेश फोगट (५० किलो), अंतिम पंघाल (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), निशा दहिया (६८ किलो) आणि रीतिका हुडा (७६ किलो) या भारताचे प्रतिनिधित्व करतील. केवळ ६२ किलो वजनी गटात भारताची महिला कुस्तीगीर ऑलिम्पिक पात्रता मिळवू शकली नाही.

हेही वाचा >>>Team India : गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये मॉर्ने मॉर्केलसह ‘या’ चार माजी दिग्गजांची लागू शकते वर्णी, जाणून घ्या कोण आहेत?

‘‘बीजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये भारताने कुस्तीतील वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला होता. तेव्हापासून टोक्योपर्यंत प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदक मिळवले आहे. ही मालिका पॅरिसमध्ये कायम राहील असा मला विश्वास आहे,’’ असे योगेश्वरने सांगितले. तसेच बऱ्याच गोष्टी ‘ड्रॉ’ अर्थात सामने कोणाविरुद्ध होणार यावर अवलंबून असेल असेही योगेश्वरने नमूद केले. ‘‘भारतीय मल्लांना अनुकूल ‘ड्रॉ’ मिळाला, तर या वेळी कुस्तीत आपल्याला किमान तीन पदके मिळतील याची मला खात्री आहे,’’ असे योगेश्वर म्हणाला.

यंदा पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिम्पिकपासून प्रथमच मल्लांना मानांकन देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताच्या अंतिम पंघालला चौथे, तर अमनला सहावे मानांकन मिळाले आहे. अंतिमचा वजनी गट आणि तिला मिळालेले मानांकन लक्षात घेता, थेट पदकाच्या लढतीतच तिच्यासमोर आव्हान उभे राहू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यापूर्वीचा तिचा प्रवास सोपा असू शकेल. अमनला मात्र जपान किंवा उझबेकिस्तानचा मल्ल पदकांच्या लढतीपूर्वी आव्हान देऊ शकतो.

‘‘ऑलिम्पिकमध्ये हॉकीनंतर कुस्तीपटूंनी भारताला सर्वाधिक पदके मिळवून दिली आहेत, याचा मला अभिमान आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकाराचा विचार करायचा झाला, तर कुस्ती हा भारताचा सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळ ठरतो. भारतीय मल्लांनी हे सिद्ध केले आहे आणि या वेळीही ते पदकांची कमाई करून दाखवतील,’’ असे म्हणत योगेश्वरने भारतीय कुस्तीगिरांना शुभेच्छा दिल्या.

ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला प्रथमच दुहेरी आकडा गाठण्यात यश येईल असे योगेश्वरला वाटते. या वेळी भारतीय संघ ऐतिहासिक कामगिरी करताना किमान १० पदके घेऊन परत येईल, असा अंदाज योगेश्वरने व्यक्त केला.

छत्रसालच्या विद्यार्थ्याकडून पदक अपेक्षितच अमन सेहरावत

सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि रवी दहिया या ऑलिम्पिक पदकविजेत्यांप्रमाणेच अमन सेहरावतही दिल्लीतील प्रतिष्ठित छत्रसाल स्टेडियममधील कुस्ती अकादमीचा विद्यार्थी आहे. आता दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवत पॅरिसमध्ये पदककमाईसाठी अमन सज्ज झाला आहे. ‘‘ऑलिम्पिक पदक जिंकणे हे स्वप्न आहे. छत्रसालने भारतीय कुस्तीला खूप दिग्गज मिळवून दिले आहेत. छत्रसालच्या विद्यार्थ्याकडून ऑलिम्पिक पदक हीच अपेक्षा असते. ती पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे,’’ असे अमन सेहरावत म्हणाला.