Yogeshwar Dutt says Vinesh Phogat should apologize to the country : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचली आणि पदक निश्चित झाले. मात्र, अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेश भारतात परतल्यावर विमानतळावर तिचे जंगी स्वागत झाले. विनेशने आता राजकारणात प्रवेश केला आहे. आता तिची बहीण बबिता फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तने विनेशला लक्ष्य केलं आहे. योगेश्वर दत्त म्हणाला की, विनेशने पॅरिसहून परत येऊन देशाची माफी मागायला हवी होती. तर बबिताने विनेशला अपात्र होण्यासाठी जबाबदार धरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनेश फोगटचे विमानतळावर स्वागत करायला नको होते –

‘आज तक’शी बोलताना योगेश्वर दत्तने सांगितले की, विनेश फोगटचे पॅरिसहून परतल्यानंतर विमानतळावर केलेले स्वागत चुकीचे होते. तो म्हणाला, “ऑलिम्पिकमधील अपात्रतेबद्दल बोलूया. सर्वप्रथम, जेव्हा एखादा खेळाडू अपात्र ठरतो तेव्हा त्याने देशाची माफी मागितली पाहिजे की त्याने चूक केली आणि माझ्यामुळे देशाला पदक गमवावे लागले. यासाठी तिने पंतप्रधानांवर आरोप केले. या घटनेला षडयंत्र म्हटले.”

विनेश फोगटने माफी मागायला हवी होती –

योगेश्वर दत्त पुढे म्हणाला, “प्रत्येकाला माहित आहे की खेळाडूचं वजन एक ग्रॅम कमी असो किंवा ५० ग्रॅम किंवा १०० ग्रॅम जास्त असला तरी तो अपात्र ठरतो. याबाबत चुकीचे वातावरण निर्माण केले. विनेशला अपात्र ठरवल्यानंतर नियमांचं किंवा संघटनेचं किंवा आयोजकांचं चुकलं, असे वातावरण देशभर निर्माण केलं. तिच्या जागी मी असतो, तर मी माफी मागितली असती की, मी माझे वजन नियंत्रणात आणू शकलो नाही, माझ्यामुळे देशाला पदक गमवावे लागले. इथे तर तिचे स्वागत होत आहे, देश पंतप्रधानांना शिव्या देत आहे. चुकांचे स्वागत करण्याची प्रथा सुरू झाली आहे जी चुकीची आहे.”

हेही वाचा – ICC कसोटी क्रमवारीत विराट-रोहितला मोठा फटका! यशस्वी टॉप-५ मध्ये दाखल तर ऋषभचे दमदार पुनरागमन

बबितानेही विनेशला जबाबदार धरले –

बबिताने तिची चुलत बहीण विनेश फोगटला अपात्रतेसाठी जबाबदार धरले. ती म्हणाली, “मी स्वत: २०१२ मध्ये अपात्र ठरली होते. मला भारतातही अपात्रतेची शिक्षा झाली. त्या वर्षी मी ऑलिम्पिक चाचण्याही खेळू शकले नाही. कारण ती माझी चूक आहे, हे मला माहीत होतं. मला २०० ग्रॅमच्या फरकामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. ही जबाबदारी खेळाडूची असते, कारण खेळाडूला वजन मोजण्याच्या मशीनवर उभे राहावे लागते. तिथे प्रशिक्षक किंवा कोणताही सपोर्टिंग स्टाफ उभा राहत नाही. कोचिंग स्टाफ प्रयत्न करतो पण शेवटी आमचीच चूक असते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogeshwar dutt says vinesh phogat herself is responsible for paris olympics disqualification and she should apologize to the country vbm