आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या सुवर्णपदकासह एकूण पाच पदकांची कमाई केली. योगेश्वरने कुस्तीमधील आशियाई स्पर्धेतील गेल्या २८ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ रविवारी संपुष्टात आणला. अ‍ॅथलेटिक्समध्ये २० किमी. चालण्याच्या शर्यतीमध्ये खुशबीर सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. अ‍ॅथलेटिक्समध्येच ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत पुरुषांमध्ये राजीव आरोकिआ आणि महिलांमध्ये पुवम्मा यांनी कांस्यपदक पटकावले, तर गोळाफेक स्पर्धेत मंजूबालाने कांस्यपदक मिळवले. टेनिसमध्ये साकेत मायनेनीला पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदकाची संधी आहे, तर युकी भांब्री आणि दिविज शरण जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सानिया मिर्झा आणि महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे जोडीने कांस्यपदकावर नाव कोरले.
कुस्ती
‘‘आशियाई स्पर्धेत मला सुवर्णपदक पटकावता आलेले नाही, पण तो सोनेरी दिवस लांब नाही, इन्चॉनमध्ये मी सुवर्णपदकाला नक्कीच गवसणी घालेन,’’ हे शब्द कुस्तीपटू योगेश्वर दत्तने सत्यात उतरवत आशियाई क्रीडा स्पर्धेतील २८ वर्षांपासूनचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला. ६५ किलो वजनी ‘फ्री-स्टाइल’ गटामध्ये ताजिकिस्तानच्या झालिमखान युसूपोव्हचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
१९८६ साली सेऊलमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताच्या करतार सिंग यांनी सुवर्णपदक पटकावले होते, पण त्यानंतर भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. त्यानंतर २८ वर्षांनी योगेश्वरने भारताला सोनेरी दिवस दाखवला.
कुस्तीच्या अन्य लढतींमध्ये मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पुरुषांच्या ९७ किलो वजनीगटातील ‘फ्री-स्टाइल’ प्रकारात सत्यव्रत काडियनला पराभव स्वीकारावा लागला, महिलांच्या ५५ किलो वजनी गटातील ‘फ्री-स्टाइल’ प्रकारात बबिता कुमारीलाही विजय पदरी पाडून घेता आला नाही.
२००६ साली योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत योगेश्वरला जास्त घाम गाळावा लागला होता. या फेरीत अखेरच्या काही सेकंदांमध्ये योगेश्वरने खेळात कमालीची सुधारणा करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीच्या सुरुवातीला योगेश्वरने युसूपोव्हला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्याला अपयश आले होते. पहिल्या फेरीच्या अखेरीस योगेश्वरने पहिला गुण कमावला. दुसऱ्या फेरीत त्याने दोन गुण कमावत हा सामना ३-० असा निर्विवादपणे जिंकला.
कांस्यपदकाच्या सामन्यामध्ये सत्यव्रतला कझाकिस्तानच्या मामेद इब्रागिमोव्हने ३-० असे पराभूत केले, तर बबिताला चीनच्या झोंगकडून १०-२ असा पराभव पत्करावा लागला.

Story img Loader