’युक्रेनच्या ओक्साना हेरहेलला सर्वाधिक बोली ’महाराष्ट्राच्या नरसिंग व राहुल यांनाही चांगली बोली
प्रो-कुस्ती लीगमध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू होण्याचा मान ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तने पटकावला. या लिलावामध्ये योगेश्वरने ऑलिम्पिक रौप्य व कांस्यपदक विजेत्या सुशील कुमारलाही मागे टाकले. या लिलावात युक्रेनच्या ओक्साना हेरहेलला सर्वाधिक बोली मिळाली. महाराष्ट्राच्या नरसिंग यादव व राहुल आवारे यांच्यावरही या लिलावात चांगली बोली लागली. ही लीग १० ते २७ डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे.
योगेश्वरला हरयाणाने ३९ लाख ७० हजारची बोली लावून संघात स्थान दिले. सुशील कुमारला उत्तर प्रदेशने ३८ लाख २० हजार रुपयांच्या मानधनावर संघात घेतले. युक्रेनच्या ओक्साना हेरहेल याला सर्वाधिक बोली लाभली आहे. हरयाणाने ४१.३० लाख रुपयांच्या बोलीसह त्याचा संघप्रवेश निश्चित केला.
सुशील कुमार, योगेश्वर नरसिंग, गीता फोगाट (भारत), अॅडेलिन ग्रे (अमेरिका), सोफिया मॅटिसन (स्वीडन) या खेळाडूंसाठी ३३ लाख रुपयांची किमान बोली ठेवण्यात आली होती. प्रत्येक संघासाठी दोन कोटी रुपयांची मर्यादा देण्यात आली होती.
मुंबईच्या नरसिंगला बंगळुरू संघाने ३४ लाख ५० हजार रुपयांच्या बोलीसह संघात घेतले. पुण्याचा मल्ल राहुल आवारेला मुंबईने २६ लाख ६० हजार रुपयांच्या बोलीवर संघात स्थान दिले. अॅडेलिनला मुंबईने ३७ लाख रुपये मोजून संघप्रवेश दिला. गीता व सोफिया यांना अनुक्रमे पंजाब व दिल्ली यांनी प्रत्येकी ३३ लाख रुपये मानधन देत संघात दाखल केले. बबिताला उत्तर प्रदेशने ३४.१० लाख रुपयांच्या मानधनावर, तर विनेशला दिल्लीने २९.७० लाख रुपयांच्या बोलीवर संघात स्थान दिले.
’खेळाडूंची आखणी
प्रत्येक फ्रँचाइजीकडे पाच भारतीय व चार परदेशी असे एकूण नऊ खेळाडू असतील. त्यामध्ये चार महिला खेळाडूंचा समावेश आहे.
’लीगमधील फ्रँचाइजी
दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मुंबई व बंगळुरू.
’स्पर्धेची ठिकाणे
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, लुधियाना, नोएडा व गुरगाव.