अर्जुन तेंडुलकरने आता त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावताच अर्जुनने वडिलांच्या ३४ वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या युवा अष्टपैलू खेळाडूने राजस्थानविरुद्ध गोव्याकडून पदार्पणाच्या रणजी सामन्यात शतक झळकावले. याआधी सचिनने १९८८ मध्ये गुजरातविरुद्धच्या रणजी ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यातही शतक झळकावले होते.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील आणि स्वत: क्रिकेटपटू योगराज सिंग अर्जुन तेंडुलकरच्या शतकापासून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. अर्जुनने पदार्पण करण्यापूर्वी या वर्षी सप्टेंबरमध्ये योगराज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले होते. आणि आता योगराज यांनी अर्जुनाला दिलेला ‘गुरुमंत्र’ कामी आला असे लोक मानतात. अर्जुन तेंडुलकरने २०७ चेंडूत १२० धावांची शानदार खेळी केली.
योगराज यांनी अर्जुनला पाठवला संदेश –
अर्जुन तेंडुलकरने शतक झळकावल्यापासून अर्जुनचा योगराज सिंगसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच चाहते योगराज सिंगचे सोशल मीडियावर खूप कौतुक करत आहेत. अभिनेता योगराज सिंग सध्या एका शूटच्या निमित्ताने यूकेमध्ये आहे. त्यांनी बुधवारी अर्जुन तेंडुलकरला संदेश पाठवला. त्यांनी आपल्या संदेशमध्ये लिहिले की, “बेटा, खूप चांगली फलंदाजी केली. एक दिवस महान अष्टपैलू होणार. माझे शब्द लक्षात ठेव.”
गोव्यासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अर्जुनने १७८ चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १६ चौकार आणि दोन षटकारही मारले. अर्जुन आणि त्याचा साथीदार सुयश प्रभुदेसाई यांच्यातील शानदार भागीदारीच्या जोरावर गोवा संघाने ४०० धावांचा टप्पा पार केला. गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात प्रभुदेसाईनेही शतक झळकावले.
योगराज यांनी सुरुवातीला सिक्सर किंग आणि त्यांचा मुलगा युवराज सिंगलाही प्रशिक्षण दिले आहे. योगराज यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये त्यांना अशी विनंती आली होती, ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. योगराज म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात युवराज सिंगने मला फोन केला आणि सांगितले की बाबा अर्जुन दोन आठवडे चंदीगडमध्ये राहणार आहे. मला सचिन तेंडुलकरने सांगितले आहे की, अर्जुनला तुम्ही प्रशिक्षण द्यावे असे सांगितले आहे. मी सचिनला नाही कसे म्हणू शकतो? तो माझ्या मोठ्या मुलासारखा आहे. माझी ट्रेनिंगची पद्धत वेगळी आहे, म्हणून मी अर्जुनला सांगितले की पुढचे १५ दिवस तू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहेस हे विसरून जा.”