Yograj Singh on Arjun Tendulkar: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे त्यांच्या बेधडक विधानांमुळं चर्चेत आहेत. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदी भाषा, महिला, कपिल देव, युवराज सिंग आणि काही राजकारण्यांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. याच मुलाखतीमध्ये आता त्यांनी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही उल्लेख केला. अर्जुन तेंडुलकर २०२२ साली योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता. मात्र त्याने अचानक प्रशिक्षण घेणं बंद केलं होतं. योगराज सिंग यांची चंदीगड येथे क्रिकेट अकादमी आहे. अष्टपैलू असलेल्या अर्जुन तेंडुलकरनं या अकादमीत प्रवेश घेतला होता. मात्र तो केवळ १२ दिवसच इथे राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगराज सिंग यांनी दावा केला आहे की, अर्जुन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत असतानाच त्यानं रणजी करंडकात खेळताना शतक ठोकले होते. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याला घेण्यात आलं होतं. मात्र अर्जुन तेंडुलकरनं मध्येच त्यांची अकदामी सोडण्याचं कारण विचारलं असता योगराज सिंग म्हणाले की, माझ्याबरोबर एका अष्टपैलू खेळडूचं नाव लावलं जाऊ नये, असे लोकांना वाटत होतं.

हे वाचा >> Yograj Singh: हिंदी ही ‘बायकी’ भाषा, बायकांना अधिकार देऊ नका; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा बरळले

अनफिल्टर्ड बाय समदीश या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले, “सचिन तेंडुलकरचा मुलगा माझ्या अकदामीत आला आणि १२ दिवस राहिला. या काळात त्याने एक शतक ठोकलं. त्याने शतक केलं आणि नंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा लोकांना वाटलं की, आता त्याचं नाव माझ्याशी जोडलं जाईल. तुम्हाला माझा मुद्दा समजला ना?” योगराज सिंग पुढं म्हणाले, चांगल्या खेळाडूचं नाव इतर कुणाशी जोडलं जाऊ नये, असं लोकांना वाटतं. मी युवराजला म्हणालो की, सचिनला फोन करून सांग आणि अर्जुनला माझ्याकडे वर्षभरासाठी पाठव. मग बघ नंतर काय होतं.

हे ही वाचा >> Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान

योगराज सिंग आणि अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेटमधील योगदान

योगराज सिंग यांनी भारतासाठी एक कसोटी सामना आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. अर्जुन तेंडुलकर आता २५ वर्षांचा आहे. त्याने प्रथम दर्जाचे १७ सामने खेळले असून त्यात ५३२ धावा आणि ३७ विकेट मिळवल्या आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी दोन सीझनमध्ये मिळून त्याने पाच सामने खेळले आहेत. नोव्हेंबर २०२४ साली झालेल्या आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला ३० लाखांच्या बोलीवर पुन्हा एकदा संघात घेतलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yograj singh reveals why sachin tendulkar son arjun tendulkar stopped training under him kvg