रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशवर टी-२० मालिकेत २-१ ने मात केली. अखेरच्या टी-२० सामन्यात लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विश्वचषकाआधी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार यावर बराच उहापोह झाला होता. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकासाठी आपली पहिली पसंती दिली आहे. श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
“माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे. तू चौथ्या क्रमांकावर खेळणार आहेस, त्यामुळे स्वतःची मानसिक तयारी कर. गेल्या काही मालिकांपासून मला चौथ्या क्रमांकासाठी एक मापदंड ठरवायचा होता.” अखेरच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यर पत्रकार परिषदेत बोलत होता.
दरम्यान अखेरच्या टी-२० सामन्यातही ऋषभ पंतला फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. ९ चेंडूत ६ धावा करुन पंत माघारी परतला. याआधीच्याही मालिकांमध्ये पंत फलंदाजीत अपयशी ठरला होता. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.