मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेच्या चाळिसाव्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे आणि समोर ठाकला आहे तो गटविजेत्या पंजाबला धूळ चारणारा सौराष्ट्रचा संघ. पण असे असले तरी मुंबईचे सौराष्ट्रपेक्षा नक्कीच पारडे जड असल्याचे अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर आणि प्रवीण अमरे या मुंबईच्या आणि भारताच्या माजी क्रिकेटपटूंना वाटत आहे. ‘मुंबईचा संघ जिंकण्यासाठी सक्षम आहे, यात वादच नाही. पण संघाने गाफील नक्कीच राहू नये’ अशा भावना या तिन्ही कर्णधारांनी व्यक्त केल्या आहेत.
‘‘दोन्ही संघांवर नजर टाकली तर मुंबईचा संघ नक्कीच वरचढ आहे. संघात सचिन तेंडुलकरसारखा अनुभवी खेळाडू असल्याचा फायदा नक्कीच संघाला होईल. पण मैदानावर जी कामगिरी होते, त्याच्या जोरावर कोणताही संघ जिंकू शकतो. हरयाणाविरुद्धची अंतिम फेरी आम्ही फक्त दोन धावांनी हरलो होतो, त्यावेळी मुंबईचा संघ नक्कीच वरचढ होता. त्यामुळे मला वाटते की, या संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता नक्कीच आहे. पण त्यांनी गाफील राहू नये. प्रत्येक संधीचे त्यांनी सोने करायला हवे. कामगिरीत सातत्य राखल्यास विजेतेपद आपल्यालाच मिळेल,’’ असे मत माजी कसोटीपटू कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
या विषयी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर म्हणाले की, ‘‘मुंबईचा संघ सौराष्ट्रपेक्षा नक्कीच उजवा आहे. त्यामुळे अंतिम सामना मुंबईच जिंकेल, असा मला विश्वास आहे. संघात सचिनसारखा अनुभवी खेळाडू आहे, त्याच्या फक्त असण्यानेच संघाला हुरूप येतो आणि प्रतिस्पर्धी धास्तावतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे संघ सक्षम असला तरी त्यांनी गाफील राहण्याची चूक करू नये. मुंबईने लौकिकाला साजेसा खेळ केला तर चौथ्या दिवशी विजेतेपदाच्या चषकावर मुंबईचे नाव कोरले जाईल.’’
भारताचे माजी कसोटीपटू आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे म्हणाले की, ‘‘मुंबई ४४ वेळा अंतिम फेरीत पोहोचली आहे आणि ३९ वेळा विजेतेपद पटकावले आहे, यावरून मुंबईचा संघ अंतिम फेरीत कसा खेळतो हे कळून येईल. सचिनसारख्या अनुभवी खेळाडूचा संघाला नक्कीच फायदा होईल. पंजाबसारख्या संघाला नमवून सौराष्ट्रचा संघ अंतिम फेरीत आला आहे, त्यामुळे आपला संघ जिंकण्यासाठी सक्षम असला तरी त्यांनी गाफील राहू नये. आतापर्यंत जसा दर्जेदार खेळ केला, तसाच खेळ केल्यास मुंबईचा संघ विजेतेपदावर आपले नाव कोरेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा