India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषक २०२३मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजीची धावसंख्या १४८/४ अवघड परिस्थितीत असताना रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला होता. या अष्टपैलू खेळाडूला या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या पुढे पाठवण्यात आले. माजी गोलंदाज अनिल कुंबळेने कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
रवींद्र जडेजा भारतीय डावाच्या २९व्या षटकात केवळ ९ धावा काढून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव याला मैदानात उतरवण्यात आले. मात्र, शेवटी मोठी धावसंख्या उभारण्यात तोही अपयशी ठरला. कर्णधाराच्या या निर्णयावर अनिल कुंबळेने ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणात म्हटले, “तुम्हाला काळजी वाटत आहे की सूर्यकुमार यादव बाहेर पडला तर काय होईल? जेव्हा तुम्ही मोठे ध्येय ठेवता तेव्हा तुम्हाला त्या परिस्थितीत घडणाऱ्या घटनांचा विचार करण्याची गरज असते. सध्या सामन्यात काय घडत आहे हे महत्त्वाचे होते, तरीही तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी देणे आवश्यक वाटले नाही, हे फक्त भारतचं करू शकतो.
पुढे कुंबळे म्हणाला की, “सूर्यकुमारला जडेजाच्या आधी पाठवता आले असते, कारण तो एक चांगला फलंदाज आहे. तुम्ही त्याच्याकडून ती षटके खेळण्याची अपेक्षा करू शकता.”सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्यात खेळलेल्या आपल्या डावात २८ चेंडूत १८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठले आणि सहावे विजेतेपद पटकावले.
चर्चेत सहभागी झालेला माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडी म्हणाला, “जर ते वानखेडे स्टेडियम असते, सेमीफायनलमध्ये असणारी सपाट खेळपट्टी असती तर त्यावेळी मी सूर्यकुमारला संघात घेतले असते. त्यावेळी त्याने ६०-७० धावा करून संघाला हातभार लावला असता. इथे मला त्याच्या जागी इशान किशन संघात असणे आवश्यक वाटत होते. विजयी संघात बदल करत नाही, हे मी समजू शकतो. मात्र, जेव्हा तुम्ही थोडं आव्हानात्मक असलेल्या खेळपट्टीवर खेळत असता, तेव्हा तुम्ही त्याच्यासारख्या आक्रमक आणि प्रभावशाली खेळाडूला शेवटच्या १० षटकांमध्ये प्रभाव पाडणे जवळजवळ अशक्य करून टाकता. म्हणून, १५ पेक्षा जास्त षटके असताना त्याला फलंदाजीला बोलवले गरजेचे होते. त्याला खेळपट्टीचा अंदाज आणि वेगाशी परिचित होण्यास मदत झाली असते.”
मोठ्या स्पर्धांमध्ये संघाची अशी कामगिरी होती
राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत प्रवेश केला. २०२२ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर, २०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा बाद फेरीत पराभव केला आणि भारतीय संघाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अधुरे राहिले.