यंदाच्या हंगामातील आमचा सराव विजेतेपदाच्या ईष्रेनेच सुरू आहे. आम्हा दोन्ही प्रशिक्षकांचा अनुभव संघाला हे यश मिळवून देऊ शकतो, असा विश्वास यू मुंबा संघाचे प्रशिक्षक रवी शेट्टी यांनी व्यक्त केला.
प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात उपविजेतेपद मिळवणाऱ्या यू मुंबाचे मार्गदर्शक शेट्टी म्हणाले, ‘‘मागील वर्षी पहिल्या सामन्यात तंत्र, कौशल्य आणि स्थानिक चाहतावर्ग यांच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध जिंकता आले. मात्र अंतिम सामन्याप्रसंगी शब्बीर बापू आणि जिवा कुमार यांच्या दुखापतींमुळे आमच्या चिंतेत भर पडली. शब्बीरने फक्त सहा सामन्यांत चढायांचे ६४ गुण कमवले होते, परंतु तो खेळू न शकल्यामुळे जयपूरविरुद्ध आमचा संघ कमजोर झाला. तसेच जिवाकडे कोणत्याही जागी उभे राहून क्षेत्ररक्षण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जेतेपद पटकावण्यात अपयश आले.’’
यंदाच्या हंगामात यू मुंबाचा संघ तंदुरुस्तीसाठी रग्बी, फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतो. याबाबत शेट्टी म्हणाले, ‘‘कबड्डीच्या सरावाआधी दररोज त्याच त्या कसरती खेळाडू करतात. मात्र त्यांना तंदुरुस्ती कमवताना वैविध्यपूर्णता मिळाली, तर त्यांचे मन रमेल, या हेतूने आम्ही विविध खेळांचा सराव करतो.’’
यंदा बंगळुरू बुल्सचा संघ मला ताकदवान वाटतो. त्यांच्यापासून सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. इराणी आव्हानाबाबत ते म्हणाले, ‘‘इराणचा खेळाडू आमच्या संघातसुद्धा आहे. व्हिसाच्या अडचणीमुळे तो अद्याप भारतात येऊ शकलेला नाही. तो आल्यावर संघाचा समतोल साधणाऱ्या सरावानंतरच त्याला प्रो कबड्डीत पदार्पण करता येईल. आशियाई क्रीडा स्पध्रेतील इराणी खेळाडूंचा खेळ हा प्रभावी झाला होता. त्यामुळे त्याचे दडपण  असेल.’’
फक्त पाच बदली खेळाडू वापरणे आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, हे नवे नियम या वेळी अमलात आणण्यात येणार आहे. याबाबत शेट्टी म्हणाले, ‘‘मागच्या हंगामात असंख्य खेळाडू बदली केले जायचे. चढाईच्या वेळी चांगला चढाईपटू आणि पकडीच्या वेळी चांगला पकडपटू मैदानात असेल, यासाठी हे बदल व्हायचे. मात्र या प्रक्रियेत अनेक मिनिटे वाया जायची. त्यामुळे या वर्षीचा झालेला नियम हा स्वागतार्ह आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाबाबत मात्र मी समाधानी नाही. कारण आमचा चढाईपटू प्रतिस्पध्र्याच्या अंगणात जाईल, तेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल. ३० सेकंदांच्या आत चढाई पूर्ण होत असल्यामुळे एकत्रित होणे आणि चर्चा करणे यासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध होईल. दुसरे म्हणजे चढाईपटू या चर्चेपासून अनभिज्ञ असेल. ’’

दुखापती टाळणे आणि कामगिरी सुधारणे, हेच धोरण -ई. भास्करन्
‘‘गेल्या वर्षी तंदुरुस्तीवर फारसे लक्ष देता आले नव्हते. या वर्षी ४० दिवसांचे विशेष सराव सत्र तयारीसाठी उपयुक्त ठरले. मातीतल्या कबड्डीत गंभीर दुखापती होत नाहीत, परंतु मॅटवर खेळताना गुडघा सांभाळणे, महत्त्वाचे असते. दुखापती टाळणे आणि कामगिरी सुधारणे हेच धोरण स्वीकारले आहे,’’ असे यू मुंबाचे रणनीती सल्लागार ई. भास्करन् म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘सामन्यादरम्यान होणाऱ्या दुखापती टाळणे कठीण असते. गेल्या हंगामातील अंतिम सामन्यात शब्बीर बापू दुखापतीवर मात करून खेळला, परंतु नशिबाची साथ आम्हाला लाभली नाही. संघासोबत सहयोगी प्रशिक्षकांचा चमू कार्यरत आहे. त्यामुळे आता दुखापतींचा दर  ५ टक्क्यांपर्यंत आणला आहे.’’

Story img Loader