सलग दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाच्या वेळेची मानसिकता स्पष्ट केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सातत्याने पराभवाला सामोरे गेल्यानंतर मी स्वत:लाच प्रश्न विचारू लागलो होतो. त्यावेळी सततच्या पराभवांमुळे मी प्रचंड दडपणाखाली होतो, असेही धोनीने स्पष्ट केले.  
‘‘पराभव पचवणे खरोखरच कठीण असते. आपण शेवटी माणूस आहोत आणि त्यामुळे पराभवामुळे व्यथित होणे स्वाभाविक आहे. आम्हाला पराभवाने फरक पडत नाही किंवा पराभवाची चिंता नाही, असे म्हणतात ते नक्कीच खरं बोलत नाहीत. खडतर परिस्थितीत दडपण असणे स्वाभाविक आहे. तुम्हाला देशासाठी चांगली कामगिरी करायची असते, पण तसे घडत नाही. अशा वेळी शांत राहणे आवश्यक असते. नकारात्मक विचारांना मनात अवाजवी स्थान न देणे अत्यंत आवश्यक असते,’’ असे धोनीने सांगितले.
भारताचा सर्वाधिक कसोटी विजयांचा कर्णधाराचा विक्रम नावावर करणाऱ्या धोनीला याबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘‘कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे. जेवढे सातत्य आमच्या कामगिरीत राहील तेवढे महत्त्वाचे आहे. आकडय़ांमध्ये आम्हाला स्वारस्य नाही. इंग्लंडविरुद्ध धावफलकावर आम्ही पुरेशा धावा उभ्या करू शकलो नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही उणीव आम्ही भरून काढली आहे. पाचवा गोलंदाज घेऊन खेळण्याचे डावपेच यशस्वी ठरले.’’

धोनी सर्वात यशस्वी कर्णधार
हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत धोनीने भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान पटकावला. धोनीने ४५ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवताना २२ विजय मिळवले असून त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला. गांगुलीने ४९ कसोटी सामन्यांमध्ये २१ विजय मिळवले होते.
यापूर्वी धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान पटकावला आहे. २०११चा विश्वचषक त्याने भारताला जिंकून दिला होता. त्याचबरोबर भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानही गाठून दिले होते. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणे गांगुलीला जमले नसले तरी धोनीने ते करून दाखवले.
यापूर्वी मोहम्मद अझरने संघाला ४७ सामन्यांमध्ये १४ विजय मिळवून दिले होते, तर मन्सूर अली खान पतौडी यांनी ४० सामन्यांमध्ये ९ विजय मिळवले होते. राहुल द्रविडने कर्णधारपद भूषवताना संघाला २५ सामन्यांमध्ये ८ विजय मिळवून दिले होते.