India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२०मध्ये भारताने १७९ धावांचे लक्ष्य तीन षटके बाकी असताना गाठले आणि अनेक विक्रम केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून आता पाचव्या सामन्यातच या मालिकेतील विजेता निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताने लॉडरहिल मैदानावर सर्वात यशस्वी टी२० धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने भारतासाठी विक्रमी भागीदारी केली. त्यावर भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने सूचक विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फ्लोरिडातील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे,” असा विश्वास वसीम जाफरने व्यक्त केला. “त्यामुळे खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या फलंदाजांना धावा करण्याची संधी मिळेल,” असे तो म्हणाला. वसीम जाफर पुढे म्हणाला, “ संजू सॅमसनला धावांची गरज आहे. हे एक मोठ्या धावसंख्येचे मैदान आहे, जिथे चेंडू सहजरीत्या बॅटवर येतो आणि ‘ऑन द राईज फटके मारू शकतो. जो कोणी फलंदाज या खेळपट्टीवर खेळेल तो ही सुवर्ण संधी कधीच गमावणार नाही. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी त्याचा फायदा घेतला, आता संजू सॅमसनला याचा विचार करण्याची गरज आहे. जर तुम्ही खराब फॉर्ममधून जात असाल तर तुम्हाला यापेक्षा चांगली खेळपट्टी मिळणार नाही पण, मालिका जिंकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा: IND vs WI 4th T20: आशिया चषकापूर्वीचं राहुल-किशनला आव्हान! विकेटकीपर संजू सॅमसनचा हा अफलातून झेल पहिला का?

जाफरने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलच्या कर्णधारपदाचेही कौतुक केले आहे. त्याच्या मते, “आता तो अधिक गंभीर दिसत आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.” जाफर पुढे म्हणाला, “असे दिसते की, कर्णधारपदाच्या जबाबदारीचा त्याच्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. निकोलस पूरननंतर विंडीजचा संघ ज्याच्यावर विश्वास ठेवू शकेल असा दुसरा कोणी फलंदाज असेल तर तो रोव्हमन पॉवेल आहे.”

हेही वाचा: IND vs WI 5th T20: विजयाची हॅटट्रिक साधत टीम इंडिया मालिका जिंकणार की विंडीज कमबॅक करणार? अशी असेल प्लेईंग ११

सामन्यात काय झाले?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत यजमानांचा नऊ विकेट राखून पराभव केला. लॉडरहिलमधील विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता रविवारी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शुबमन गिल (७७) आणि यशस्वी जैस्वाल (८४*) यांनी १६५ धावांची भागीदारी करून सामना भारताच्या बाजूने वळवला. अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने ३८ धावांत तीन विकेट्स घेतले, तर कुलदीपने अवघ्या ६.५०च्या सरासरीने गोलंदाजी करताना २६ धावांत दोन विकेट्स घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You wont get a better pitch than this wasim jaffer gave this advice to shubman gill jaiswal and sanju samson avw