युवा खेळाडू संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे संघात दिग्गज खेळाडूंची उणीव भासत नाही, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.
शनिवारी रात्री राजस्थानने मुंबई इंडियन्सवर विजय मिळविल्यानंतर द्रविड म्हणाला की, ‘‘आमची गोलंदाजी अप्रतिम झाली. विक्रमजीत मलिकचे विशेष कौतुक करायला हवे. त्यामुळेच आम्ही मुंबईला १४२ धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवू शकलो. त्यानंतर अत्यंत व्यावसायिक संघाविरुद्ध चांगल्या फलंदाजीची आवश्यकता होती. पण अपेक्षेप्रमाणे आमची गोलंदाजीही यशस्वी झाली.’’
‘‘मी बाद झाल्यानंतर संजू आणि रहाणे यांनी जबाबदारीपूर्ण भागीदारी रचली. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चार गोलंदाजांचा या दोघांनी हिंमतीने सामना केला. मग शेन वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी अतिशय शानदार पद्धतीने राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले,’’ असे द्रविड म्हणाला.