पाकिस्तान संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील प्रवास गट टप्प्यातच संपला आहे. यजमान संघ असूनही एकही सामना न जिंकता या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतूनच यजमान पाकिस्तान बाहेर पडला आहे. दुसरीकडे, शेजारी देश अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा पराभव करत मोठा अपसेट घडवला.

इंग्लिश संघाविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज युनूस खानची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात आहे. या स्पर्धेपूर्वी त्याची अफगाणिस्तान संघाचा मेन्टॉर म्हणून निवड झाली होती. मात्र आता त्यांच्या या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया.

पाकिस्तानच्या टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाचा माजी कर्णधार युनूस खानला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली होती, असा दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू रशीद लतीफने केला आहे. पण त्याने पाकिस्तानी खेळाडूंसह काम करण्यास नकार दिला आणि अफगाणिस्तानसाठी मेन्टॉर होण्याचा निर्णय घेतला. युनूसने पैशासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याचे मत आहे. एका पाकिस्तानी चॅनलवर लतीफ म्हणाला, ‘युनिस खानने अफगाणिस्तान संघासह काम करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नकार दिला, कारण इथे पैशाच्या बाबतीत कोणताही फायदा होणार नव्हता.’

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान हे युनूस खान यांच्या बचावात उतरले होते. त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे, त्यामुळे त्यांच्या संघाने यजमान देशाच्या अनुभवी क्रिकेटपटूची मेन्टॉर म्हणून नियुक्ती करणे आवश्यक होते. याआधीही यजमान देशाचा माजी खेळाडू मेन्टॉर म्हणून त्यांनी निवडला आहे, ज्याचा त्यांना फायदा झाला आहे. अफगाणिस्तान संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ आणि टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्येही मेन्टॉरची नियुक्तीची केली होती.

अफगाणिस्तानलाही यामुळे बऱ्यापैकी यश मिळाले आहे. ACB ने भारतानत आयोजित केलेल्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी, ACB ने माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांची संघाचा मेन्टॉर म्हणून नियुक्ती केली होती. याचा फायदा संघाला झाला आणि पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. तर वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तान संघाने या कामाची जबाबदारी ड्वेन ब्राव्होकडे सोपवली होती. यादरम्यान त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात यश आले.

Story img Loader