पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक युनिस खानने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि युनिस खान या दोघांनी परस्पर संमतीच्या आधारे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच युनिस खानला पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. त्यांचा करार दोन वर्षांचा होता. २०२२मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो या पदावर राहणार होता.
पीसीबीचे मुख्य कार्यकारी वसीम खान यांनी युनिस खानच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “युनूस खानसारख्या उत्कृष्ट आणि अनुभवी प्रशिक्षकाने पायउतार होणे आमच्यासाठी खेदजनक आहे. बरीच चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्याचे ठरविले. अल्प कालावधीत पाकिस्तानसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल मी युनिस खानचे आभार व्यक्त करू इच्छितो. आशा आहे की, होतकरू क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी तो पीसीबीसाठी नेहमीच उपलब्ध असेल”, असे खान म्हणाले.
हेही वाचा – ग्रेट..! भारताच्या ताजिंदरपालसिंग तूरने मिळवले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट
PCB statement on Younis Khan
More details https://t.co/BVvfdxn6Cp
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 22, 2021
युनिस खानच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आता पाकिस्तान संघ फलंदाजी प्रशिक्षकाशिवाय इंग्लंड दौरा करेल. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय वेळ येताच घेतला जाईल.
पाकिस्तानचा संघ २५ जून ते २० जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांसाठी इंग्लंड दौरा करणार आहे. २१ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान ते वेस्ट इंडिजला भेट देतील. त्यांना तिथे ५ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत.