इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करताना संदीप पाटील अ‍ॅण्ड कंपनीने ‘सिंग इज किंग’चाच नारा जपला. त्यामुळे अष्टपैलू युवराज सिंग आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग यांनी सुमारे वर्षभराने संघात पुनरागमन केले आहे. तामिळनाडूचा सलामीवीर मुरली विजय आणि मुंबई अजिंक्य रहाणेनेही संघातील स्थान टिकविण्यात यश मिळवले आहे. अपेक्षेप्रमाणेच सुरेश रैना, पीयूष चावला आणि एस. बद्रिनाथ यांना वगळण्यात आले आहे, तर बंगालच्या मनोज तिवारी आणि अशोक दिंडाला मात्र संघात स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या दुखापतींची शंका दूर झाल्याने त्यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रविवारी रणजी सामना खेळताना झहीरच्या पायाला आणि सेहवागच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. पण सेहवाग रविवारी उशिरा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता आणि सोमवारी त्याने शतकही साजरे केले आणि साऱ्या शंकाकुशंकांना मूठमाती दिली. याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमवरील रणजी सामन्याच्या उपाहारादरम्यान झहीरच्या गोलंदाजीची पाहणी करून त्याला हिरवा कंदील देण्यात आला.
संदीप पाटील यांच्या निवड समितीने प्रथमच भारतीय संघ जाहीर करताना सध्या अपयशी ठरणाऱ्या वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. त्यांच्यासमवेत मुरली विजय आणि सध्या फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणे या सलामीवीरांचा संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणेने भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर रेल्वेविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यातील पहिल्या डावात संयमी शतक आणि दुसऱ्या डावात रहाणेने ८४ धावांची खेळी साकारून आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन केले होते.
युवराजने आपल्या कामगिरीद्वारे निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात युवी खेळला होता. त्यानंतर कर्करोगावर मात करून युवी पुन्हा मैदानावर परतला तो श्रीलंकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये. तिथे युवीने आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी बजावली. त्यानंतर दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेतील द्विशतक आणि मग इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात साकारलेले अर्धशतक व पाच बळी ही कामगिरी युवराजच्या पथ्यावर पडली. त्यामुळे निवड समितीने कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या वक्तव्याची तमा न बाळगता युवराजला संघात स्थान देणे पसंत केले आहे.
गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पोटाचे स्नायू दुखावल्यामुळे हरभजन सिंग मायदेशी परतला होता. त्यानंतर तो भारतीय कसोटी संघात दिसला नव्हता. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा या फिरकी जोडगोळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या भारतीय भूमीवरील कसोटी मालिका जिंकल्या होत्या. पण आता आव्हान इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाचे आहे आणि चार कसोटी सामन्यांची प्रदीर्घ मालिका खेळायची आहे. त्या पाश्र्वभूमीवर फिरकीच्या बळावर मालिका जिंकण्याचे मनसुबे रचणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीने अनुभवी भज्जीला संघात स्थान दिले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत हरभजनने इंग्लंडविरुद्धच्याच सामन्यात १२ धावांत ४ बळी अशी सामना जिंकून देणारी कामगिरी साकारली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पीयूष चावलाच्या भारतीय संघातील समावेशाबद्दल सर्वानाच आश्चर्य वाटले होते. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी फिरकी गोलंदाज चावलाला वगळण्यात आले आहे. झहीर खान, उमेश यादव आणि इशांत शर्मा या त्रिकुटावरच भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सोपविण्यात आली आहे. भारतीय संघ अहमदाबादला १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत पहिली आणि १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत दुसरी कसोटी खेळणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, उमेश यादव, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, इशांत शर्मा, मुरली विजय, झहीर खान.