युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची गुणवान युवा नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी युवा (१८ वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले. ज्युडोपटू तबाबी देवीनंतर या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

मनू मिश्र आंतरराष्ट्रीय दुहेरीत तझाकिस्तानच्या बेहझान फेझुल्लाएवसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळवले. त्यांना वॅनेसा सीगर व किरिल किरोव्ह या जोडीकडून १०-३ असे पराभूत व्हावे लागले. याबरोबरच भारताच्या नेमबाजीतील सर्व स्पर्धा संपल्या असून त्यांनी स्पर्धेत एकूण दोन सुवर्ण व तीन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जिंकली असून त्यातील पाच भारताला नेमबाजीतून मिळालेली आहेत.

अंतिम फेरी गाठणाऱ्या सेनचे ‘लक्ष्य’ विजेतेपद

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनने शुक्रवारी युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

सेनने जपानच्या कोडाई नाराओकाचा संघर्षपूर्ण सामन्यात १४-२१, २१-१५, २४-२२ असा पराभव केला. अंतिम लढतीत विजेतेपदाचे लक्ष्य गाठण्यासाठी सेनला चीनच्या लि शिफेंगच्या आव्हानाचा सामना करायचा आहे. अंतिम फेरीत त्याने विजय मिळवल्यास या स्पर्धेच्या इतिहासात बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरेल. यापूर्वी प्रणॉय कुमारने सिंगापूर येथे झालेल्या २०१०च्या स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले होते.

पुरुषांचा संघ उपांत्य फेरीत

हॉकीत पुरुषांच्या संघाने उपांत्य फेरी गाठताना गटसाखळीतील अखेरच्या लढतीत पोलंडवर ४-२ असा विजय मिळवला. भारतासाठी शिवम आनंदने पहिल्या व आठव्या मिनिटाला दोन गोल करून दमदार सुरुवात केली. मनिंदर सिंग (३ मि.) आणि संजयने (१७ मि.) प्रत्येकी एक गोल करून आनंदला सुरेख साथ दिली. पोलंडसाठी इर्क बेम्बेनेक (१६) व मिचाल नोव्हाकवस्कीने (१८) गोल केले, मात्र त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.

महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय महिलांच्या संघाने ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५-२ असा पराभव करून युवा (१८ वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील हॉकी प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अर्जेटिनाविरुद्ध एकमेव पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला गटात १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतातर्फे मुमताझ खानने दोन, तर रीट, लार्लेमसिआमी आणि इशिका चौधरी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.

मुमताझने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. मात्र आफ्रिकेच्या कायला डी वालने १०व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. रीटने पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटात गोल करून मध्यांतराला भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात लार्लेमसिआमीने (१२वे मिनिट) संघासाठी तिसरा गोल नोंदवून आघाडी वाढवली. इशिकानेही पुढच्याच मिनिटाला गोल करून भारताचा विजय जवळपास निश्चित केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth olympic games
Show comments