अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मेहूली घोष हिने नेमबाजी या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. मेहूलीने १० मीटर एअर-रायफल नेमबाजीचा महिला गटात सोमवारी ही उल्लेखनीय कामगिरी केली. डेन्मार्कच्या स्टेफनी गृन्डसोयी हिने या प्रकारात अव्वल कामगिरी केली आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

अंतिम फेरीत मेहूलीने अत्यंत चांगली सुरुवात केली होती. आधीचे नेम हे १० गुणांच्या पट्ट्यात लागले. पण ऐन मोक्याच्या क्षणी तिचा शेवटचा नेम १० गुणांच्या पत्त्याचा वेध घेऊ शकला नाही. तिचा २४वा नेम तिला केवळ ९.१ गुण कमावून देऊ शकला. या नेम निर्णायक ठरला. तिची एकूण गुणांची बेरीज २४८.० इतकी झाली. केवळ ०.७ गुणांनी तिचे सुवर्णपदक हुकले. डेन्मार्कच्या स्टेफनीने एकूण २५ संधीमध्ये २४८. गुण कमावत सुवर्णपदक पटकावले.

विशेष म्हणजे या स्पर्धेत या क्रीडाप्रकारात भारताला अद्याप एकही सुवर्णपदक मिळालेले नाही. मेहुलीच्या रूपाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवण्याची संधी होती. पण तिची ‘सुवर्ण’संधी हुकली.

तत्पूर्वी, रविवारीदेखील भारताला एक रौप्यपदक मिळाले होते. ४४ किलो वजनी गटात ताबाबीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवत भारतासाठी पदक निश्चीत केले होते. अंतिम फेरीत तिला व्हेनेझ्युएलाच्या मारिया गिमेन्झकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत १३ क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे ४६ खेळाडू सहभागी झाले आहेत.