अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारताच्या युवा हॉकीपटूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पुरुष आणि महिला दोनही संघाने रौप्य पदक पटकावत भारताची पदकसंख्या १० वर पोहोचवली. भारताचा पुरुष संघ मलेशियाकडून पराभूत झाला. तर महिला संघाला यजमान अर्जेंटिनाकडून हार पत्करावी लागली.

मलेशियाशी झालेल्या सामन्यात भारताला ४-२ अशी हार पत्करावी लागली. कर्णधार विवेक सागर प्रसाद याने भारताकडून तिसऱ्या आणि सहाव्या मिनिटाला गोल केला. तर फिरदौस रोस्दीने ५व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात भारत २-१ ने आघाडीवर होता. मात्र उत्तरार्धात मलेशियन बाजी पलटवली. अझीमुल्ला अनुअर याने १४व्या आणि १९व्या मिनिटाला तर अरिफ इशाकने १७व्या मिनिटाला गोल करून मलेशियाला ४-२ असा विजय मिळवून दिला.

युवा महिला संघालादेखील स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यजमान अर्जेंटिनाने भारताला ३-१ असे पराभूत केले. भारताकडून मुमताज खानने सामन्याच्या पहिल्या मिनिटाला गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर भारताला एकही गोल मारणे शक्य झाले नाही. याउलट यजमान अर्जेंटिनाकडून जिनेला पॅलेटने ७व्या, सोफिया रॅमॅलो ९व्या आणि ब्रिसा ब्रगसरने १२व्या मिनिटाला गोल करून अर्जेन्टिनाला विजय प्राप्त करून दिला.

भारताच्या १० पदकांमध्ये ३ सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांचा समावेश आहे. यादीत सध्या भारत १०व्या स्थानी आहे. तर रशिया ४३ पदकांसह पहिल्या, हंगेरी २१ पदकांसह दुसऱ्या आणि चीन २५ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

Story img Loader