ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत प्रवेशही पक्का
स्वप्नवत सूर गवसलेल्या युकी भांब्रीने जागतिक टेनिस क्रमवारीत दमदार भरारी घेत ८९वे स्थान पटकावले आहे. १०५व्या स्थानी असणाऱ्या युकीने पुण्यात झालेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या जेतेपदाने अव्वल शंभर खेळाडूंत स्थान पटकावण्याचे युकीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत युकीचा प्रवेश पक्का झाला आहे.
यंदाच्या हंगामात युकीने शांघाय चॅलेंजर स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. या कामगिरीसह त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंत स्थान पटकावले होते. मात्र अन्य खेळाडूंनी सरशी साधल्याने युकीची १०५व्या स्थानी घसरण झाली होती. पुण्यात चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात दिमाखदार प्रदर्शनासह युकीने क्रमवारीच्या ८० गुणांची कमाई करत पुन्हा अव्वल शंभर खेळाडूंत स्थान मिळवले.
साकेत मायनेनी १६८व्या स्थानी तर सोमदेव देववर्मन १८०व्या स्थानी आहे. दुहेरीच्या क्रमवारीत रोहन बोपण्णा १४व्या तर लिएण्डर पेस ३९व्या स्थानी कायम आहे. डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सानिया मिर्झा क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा