ईडन गार्डन्सवर युसूफ पठाणने आपल्या आक्रमक फलंदाजीने चौखूर फटकेबाजी करीत समस्त कोलकाता वासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. युसूफच्या पठाणी हिसक्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने एका अशक्यप्राय विजयाची नोंद केली. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने ३४ चेंडू आणि ४ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या घणाघाती विजयानिशी कोलकाताने आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारत चेन्नई सुपर किंग्जला निव्वळ धावगतीआधारे तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. तथापि, या पराभवामुळे सनरायजर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले आहे.
कोलकाताची ९.४ षटकांत ४ बाद ७८ अशी स्थिती असताना कोलकाताला अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी झुंजावे लागणार अशी चिन्हे दिसत होती, परंतु पठाणला हे मंजूर नव्हते. त्याने फक्त २२ चेंडूंत ५ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करीत ७२ धावांची खेळी साकारून कोलकाताला शानदार विजय मिळवून दिला. त्याने फक्त १५ चेंडूंत वेगवान अर्धशतकाची नोंद करून आयपीएलमधील  अ‍ॅडम गिलख्रिस्टचा (१७ चेंडूंत) विक्रम मोडीत काढला.
परवेझ रसूलच्या ११व्या षटकात पठाणने आक्रमणाचे हत्त्यार उगारत २ चौकार आणि २ षटकारांसह २२ धावा केल्या. मग त्याच आवेशात करण शर्माच्या १२व्या षटकात त्याने २ षटकार खेचले. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अशी ख्याती असलेल्या डेल स्टेनच्या १३व्या षटकात पठाणने ३ चौकार आणि २ षटकारांनिशी २६ धावा केल्या. अखेर १४व्या षटकात करण शर्माने त्याला बाद केले. परंतु तोपर्यंत कोलकाताचा संघ विजयासमीप पोहोचला होता. त्याआधी, सनरायजर्स हैदराबादने ७ बाद १६० धावांचे आव्हान उभे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १६० (शिखर धवन २९, डॅरेन सॅमी २९; रयान टेन डोइश्चॅट १/७) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १४.२ षटकांत ६ बाद १६१ (युसूफ पठाण ७२, रॉबिन उथप्पा ४१, गौतम गंभीर २८; करण शर्मा ४/३८) सामनावीर : युसूफ पठाण.
दिल्लीविरुद्ध पंजाबचे पारडे जड
मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाब गटविजेत्याच्या थाटात आयपीएलच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये जाणार हे शुक्रवारी रात्रीच निश्चित झाले आहे, तर तळाच्या स्थानावरील दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा झगडणे सुरूच आहे. रविवारी दुपारी होणारा पंजाब आणि दिल्लीतील सामना म्हणजे निर्थक औपचारिकताच आहे. पंजाबच्या खात्यावर २० गुण तर दिल्लीच्या खात्यावर फक्त चार गुण जमा आहेत. त्यामुळेच रविवारच्या सामन्यात पंजाबचे पारडे जड आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yusuf pathan rates 22 ball 72 for kolkata knight riders