काल (१९ जून) जगभरात ‘फादर्स डे’साजरा झाला. त्यानिमित्त सामान्य नागरिकांपासून ते अनेक लोकप्रिय सेलिब्रिटिंनी आपापल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक सेलिब्रिटिंनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी आणि मुलांसाठी भावनिक पोस्ट टाकल्या. भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू युवराज सिंगनेदेखील आपल्या मुलासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली. फादर्स डेचे निमित्त साधून त्याने आणि हेझल कीचने आपल्या चिमुकल्याचे नावही जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवराज सिंगने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अभिनेत्री हेझल कीचशी लग्न केले होते. या वर्षी जानेवारीमध्ये दोघे पहिल्यांदा आई-वडील झाले. आपला मुलगा पाच महिन्यांचा होऊनही अद्याप युवराजने त्याचे नाव जाहीर नव्हते केले. मात्र, आता त्याने मुलाचे नाव उघड केले आहे. युवी आणि हेझलने आपल्या मुलाचे नाव ‘ओरियन कीच सिंह’, असे ठेवले आहे. युवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

युवीने ट्विटरवर लिहिले की, “ओरियन कीच सिंग या जगात तुझे स्वागत आहे, मम्मी आणि डॅडीचे छोट्या ‘पुत्तर’वर खूप प्रेम आहे. प्रत्येक हास्यासोबत तुझे डोळे आनंदाने लुकलुकतात, अगदी तार्‍यांमध्ये लिहिलेल्या तुझ्या नावाप्रमाणे.” युवीने मुलाचे नाव उघड केल्यानंतर सोशल मीडियावर चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने कमेंट करून युवराज आणि हेझलचे अभिनंदन केले आहे. तर, अभिनेता अभिषेक बच्चननेही कमेंटकरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूच्या सोशल मीडियावर भारतीय देवतांचे फोटो! जाणून घ्या केशव महाराजचे उत्तर प्रदेश कनेक्शन

युवराज सिंगने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुलाच्या नावाच्या अर्थाचा खुलासा केला आहे. ‘ओरियन हा तारामंडळातील एक तारा आहे आणि प्रत्येक पालकांसाठी त्यांचे मूल हे एक ताराच असते. गरोदर असताना हेझल रुग्णालयात झोपली होती. तेव्हा मी एका सिरीजचे काही भाग बघितले होते. त्यावेळी ओरियन हे नाव माझ्या मनात आले आणि हेझललादेखील ते लगेचच आवडले. शिवाय, हेझलचे आडनावही आमच्या बाळाला मिळावे, अशी माझी इच्छा होती. म्हणून त्याचे नाव ओरियन कीच सिंग ठेवले आहे.’

युवराजने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आठ हजार ७०१ धावा केल्या आणि १११ बळी घेतलेले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्याने एक हजार १७७ धावांसह २८ बळी घेतलेले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh and hazel keech named their son as orion keech singh vkk