२००७ साली इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान युवराज सिंगने स्टुअर्ड ब्रॉर्डच्या सहा चेंडूवर सहा षटकार लगावत इतिहास रचला होता. युवराज सिंगच्या या विक्रमाची आजही चर्चा केली जाते. अशातच आता आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक येऊ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीसीने युवराज सिंगची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या सहा षटकाराच्या विक्रमाची बरोबर कोण करू शकेल, याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा – PBKS VS KKR : पंजाब किंग्जला मोठा झटका, ‘या’ खेळाडूने सोडली संघाची साथ; म्हणाला, “इन्…
नेमकं काय म्हणाला युवराज सिंग?
यासंदर्भात बोलताना युवराज म्हणाला, हार्दिक पंड्या हा असा खेळाडू आहे, जो टी-२० विश्वचषकातील माझ्या सहा षटकाराच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो. हार्दिक पंड्यात ती क्षमता आहे. महत्त्वाचे म्हणजे युवराज सिंगने यावेळी आंद्रे रसेल किंवा जॉस बटलरचे नाव न घेता, हार्दिक पंड्याचे नाव घेतल्याने याची चर्चाही क्रिकेटच्या वर्तुळात सुरू आहे. युवराज सिंगच्या या मुलाखतीचा भाग सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे.
दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघातील कोणता खेळाडू विशेष प्रदर्शन करू शकेल, याबाबत विचारलं असता, युवराज सिंगने सूर्यकुमार यादव याचे नाव घेतले. सूर्या असा फलंदाज आहे, जो १५ चेंडू खेळून सामन्याचे समीकरण पूर्णपणे बदलू शकतो. भारताला टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल, तर सूर्याला चांगली कामगिरी करावी लागेल, असे तो म्हणाला. तसेच यंदाच्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे हे संघ पोहोचतील, असा विश्वासही युवराज सिंगने व्यक्त केला.