Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli: भारताने तब्बल १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका गमावत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली. याआधी भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच न्यूझीलंडविरूद्ध ३-० अशा मोठ्या फरकाने कसोटी मालिकेत पराभूत झाला. यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वच माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले. पण युवराज सिंगने मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बाजू घेत टीकाकारांना आणि चाहत्यांना आरसा दाखवला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील पराभवापेक्षा न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर झालेला पराभव ही मोठी निराशा होती, असे मत माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने व्यक्त केले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका ३-१ ने गमावली असली, तरी कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहलीवर त्यांच्या अपयशामुळे टीका करणाऱ्यांमध्ये युवराज सिंगचा समावेश नाही. गेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये भारताने ६ सामने गमावले आहेत, तर टीम इंडियाने केवळ एकच सामना जिंकला आहे. यामुळे संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही.
गेल्या दोन मालिकांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बॅट शांत राहिली. याबाबत युवराज सिंगने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “माझ्या मते, न्यूझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर ३-० असा पराभव पत्करावा लागणे जास्त वेदनादायी आहे. हा पराभव अजिबातच स्वाकार्य नाहीय, हे तुम्हालाही माहिती आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पराभव समजून घेता येईल, कारण तुम्ही ऑस्ट्रेलियात दोनदा जिंकलात आणि या वेळी तुम्ही पराभूत झालात. ऑस्ट्रेलिया गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रभावी संघ म्हणून उदयास आला आहे.
हेही वाचा – “पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्यावर टीका करणे अयोग्य असल्याचे युवराज सिंगने म्हटले आहे. तो म्हणाला, “आपण आपल्या संघाच्या महान खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल बोलत आहोत, त्यांच्याबद्दल खूप वाईट वक्तव्य केली जात आहेत, पण लोक हे विसरतात की त्यांनी काय कमावलं आहे. ते सध्याच्या काळातील एक महान क्रिकेटपटू आहेत. ठीक आहे संघ हला, त्यांनी चांगली कामगिरी केली नाही पण आपल्यापेक्षा याचं जास्त दु:ख, वेदना त्यांना होत आहेत.
युवराजचा सहकारी क्रिकेटपटू आणि सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर यांच्याबद्दल बोलताना युवी म्हणाला, “मला वाटतं की गौतम गंभीर एक प्रशिक्षक म्हणून, अजित आगरकर निवडकर्ता म्हणून, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, या सर्वांनाच सध्याच्या घडीली क्रिकेटबद्दल अधिक चांगलं ज्ञान आहे भारतीय क्रिकेट भविष्यातील कोणत्या मार्गाने जाईल हे त्यांनीच ठरवायचे आहे.”
माजी अष्टपैलू खेळाडूने सिडनी कसोटीत विश्रांती घेत स्वत:ला संघाबाहेर ठेवल्याबाबत रोहितचे कौतुक केले आणि म्हणाला, “मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. कर्णधाराचा फॉर्म चांगला नसताना तो स्वत: संघाबाहेर पडला आहे.” रोहित शर्माचा हाच मोठेपणा आहे की त्याने स्वत:आधी संघाचा विचार केला. माझ्यामते तो एक महान कर्णधार आहे, भले आपण जिंकू किंवा हरू तो नेहमीच एक महान कर्णधार असेल आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपण (ODI) विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे आणि टी-२० विश्वचषकही पटकावला. आपण खूप काही साध्य केलं आहे.”
युवराज पुढे म्हणाला, “मी माझे मत देऊ शकतो आणि माझे मत असं आहे की जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नाहीत तेव्हा त्यांच्याबद्दल वाईट बोलणं सोपं असतं, पण त्यांना पाठिंबा देणं खूप अवघड असतं. माझं काम माझ्या मित्रांना, सहकाऱ्यांना पाठिंबा देणं आहे. माझ्यासाठी ते माझे कुटुंब आहेत. इतकी साधी गोष्ट आहे.”