Yuvraj Singh Biopic Announcement: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिक्सर किंग युवराजचं आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. युवराज सिंगच्या बायोपिक येत असल्याची घोषणा झाली आहे. २०११ च्या विश्वचषकादरम्यान कर्करोगाशी झुंज देऊनही विश्वचषक खेळत भारताला विश्वविजेता बनवण्यात मोठी भूमिका बजावली. कॅन्सरवर मात करून क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या युवराज सिंगची कहाणी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. सोशल मीडियावर त्याच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होणार आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका या बायोपिकची संयुक्त निर्मिती करणार आहेत.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील या दिग्गज खेळाडूच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. युवराज सिंगच्या आधी सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांच्या बायोपिक आपण पाहिल्या आहेत. तरण आदर्शने सांगितले की, भूषण कुमार-रवी भागचंदका या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.
मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास
२०११ च्या विश्वचषकादरम्यान युवराज सिंगला कर्करोग झाला होता आणि तरीही त्याने हार मानली नाही, तो संपूर्ण विश्वचषक खेळला होता. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युवराजला या कामगिरीसाठी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब मिळाला.विश्वचषकानंतर युवराजने या आजाराबाबत खुलासा केला होता. यानंतर युवराज सिंगच्या कर्करोगावर बोस्टन आणि इंडियानापोलिसमध्ये उपचार करण्यात आले. मार्च २०१२ मध्ये केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम राऊंडनंतर, त्याने कर्करोगासारख्या मोठ्या आजारावर मात केली आणि क्रिकेटच्या मैदानावर शानदार पुनरागमन केले.
युवराज सिंगच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाह. युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे. आता यासाठी सिद्धांत चतुर्वेदीला ऑफर दिली जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Yuvraj Singh: बायोपिकची घोषणा झाल्यानंतर युवराज सिंग काय म्हणाला?
कृतज्ञता व्यक्त करताना युवराज सिंग म्हणाला, “माझा प्रवास भूषण जी आणि रवी यांच्याद्वारे जगभरातील माझ्या लाखो चाहत्यांना दाखवला जाईल याचा मला खूप सन्मान वाटतो. क्रिकेट हे माझे सर्वांत मोठं प्रेम आणि शक्तीचा स्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल.”
हेही वाचा – Manu Bhaker: ‘ते कदाचित माझ्या कानशिलात लगावतील…’, मनू भाकेर कोच जसपाल राणा यांच्याबद्दल असं का म्हणाली?
Yuvraj Singh ची क्रीडा कारकीर्द
युवराज सिंगने टीम इंडियासाठी ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. युवराज सिंगने कसोटीत एकूण १९०० धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये युवराजने एकूण ८७०१ धावा केल्या आहेत, ज्यात १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय युवराज सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत.