Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू आणि स्टार खेळाडू युवराज सिंग, ज्याने भारताला २००७ साली टी२० विश्वचषक आणि २०११ला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला आहे. तोच माजी अष्टपैलू खेळाडू म्हणतो की, “भारतीय संघ २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा मानकरी ठरणार नाही.” तो म्हणाला की, “मायदेशात विश्वचषक असूनही आम्ही जिंकू शकू की नाही याची मला खात्री नाही.” भारतीय संघाच्या मधल्या फळीत कमतरता असल्याचे युवराजने सांगितले. त्याचे हे आश्चर्यचकित करणारे विधान सध्या खूप चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेट बासू या युट्युब चॅनेलवरील फ्रीव्हीलिंग चॅटमध्ये, स्टार क्रिकेटरने भारतीय क्रिकेटच्या स्थितीबद्दल क्रीडा प्रस्तुतकर्त्यासमोर खुलासा केला. त्याला भारताच्या २०२३च्या विश्वचषकाच्या संभाव्यतेबद्दल विचारण्यात आले तेव्हाही तो म्हणाला, “जर प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला खात्री नाही की टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकेल की नाही, मी देशभक्ताप्रमाणे म्हणतो की भारत जिंकेल. मात्र, सत्य परिस्थिती आणि जर क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर भारतीय संघात खूप समस्या आहेत. त्या जर दूर केल्या नाहीत तर मी आशा करू शकतो की भारत जिंकेल पण खात्री देणार नाही. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील दुखापतींबाबत बरीच चिंता असल्याचे मला दिसत आहे.”

भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या १० वर्षांतील चढ-उतार कामगिरीबद्दल विचारले असता यावर युवराज टीम इंडियावर भडकला. युवराजने स्पष्टपणे सांगितले की, “ते (भारत) विश्वचषक जिंकू शकले नाहीत हे पाहून निराशा होत आहे, पण सत्य परिस्थिती ही आहे की मुख्य प्रश्नांकडे कोणी गांभीर्याने लक्षच दिल नाही. म्हणूनच २०२३चा वन डे विश्वचषक भारत जिंकणार नाही.”

मिडल ऑर्डरमध्ये समस्या आहे- युवराज सिंग

माजी डावखुरा फलंदाज म्हणाला की, “टीम कॉम्बिनेशन निवडतानाच भारतीय संघाला अपयश येत आहे. त्यामुळेच त्यांची निराशा होत आहे.” तो पुढे म्हणाला, “आमच्याकडे समंजस कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याला त्याचं कॉम्बिनेशन बरोबर मिळायला हवं. तयारीसाठी आम्हाला काही सामने हवे आहेत. १५ जणांचा संघ निवडण्यासाठी, आमच्याकडे किमान २० खेळाडूंचा गट असायला हवा.”

हेही वाचा: IND vs WI 1st Test: भारत-वेस्ट इंडीज पहिल्या कसोटीत पाऊस ठरणार व्हिलन? जाणून घ्या डॉमिनिकामधील खेळपट्टी आणि हवामान

विश्वचषकापूर्वी युवराजच्या म्हणण्यानुसार, “टॉप ऑर्डर ठीक आहे पण मिडल ऑर्डरमध्ये समस्या आहे. त्यात भारताला बरीच मेहनत घेण्याची गरज आहे. स्लॉट ४ आणि ५ खूप महत्वाचे आहेत. जर ऋषभ पंत आयपीएल फ्रँचायझीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल तर त्याने राष्ट्रीय संघासाठीही चौथ्या क्रमांकावर यायला हवे. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हा आक्रमक धावा करणारा असू शकत नाही. तो दबाव हाताळू शकेल अशी व्यक्ती असावी. २०१९ मध्ये टीम इंडिया जिथे उभी होती, ती अजूनही तिथेच आहे. त्याच्याकडे अजूनही चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कायमस्वरूपी फलंदाज नाही.”

नॉक-आऊट सामन्यांसारखे दबावातील सामने खेळताना भारत प्रयोग मोडमध्ये राहू शकत नाही, असेही त्याने सुचवले. त्याला स्वत:च्या क्रमांक ४ स्थानाबद्दल विचारले असता, युवराजने त्या जागेसाठी के.एल. राहुलचे नाव सुचवले. नव्या दमाचा रिंकू सिंगबाबतही त्याने विधान केले. युवराज म्हणाला, “रिंकू सिंग खरोखरच चांगली फलंदाजी करत होता. मला वाटते की त्याच्याकडे भागीदारी करण्याची आणि तो स्ट्राइक कायम ठेवण्याची समज आहे. जर तुम्हाला तो हवा असेल तर तुम्हाला त्याला पुरेसे सामने द्यावे लागतील.”

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाहीत, खुद्द जय शाहांनीच सांगितले; ‘या’ दिवशी होणार वेळापत्रक जाहीर

“पुढे त्याला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल का?” असे विचारले. यावर त्याने सांगितले की, “होय, मला वाटते की मी एक चांगला प्रशिक्षक होईन. पण त्यासाठी तुम्हाला काळाबरोबर राहावे लागेल. सध्या मात्र मी हा विचार करत नाही. माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदीही चांगली निवड करण्यात आली आहे. जर त्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य संघ निवडला तरच भारत विश्वचषक जिंकू शकतो. मात्र, त्यासाठी दुखापतग्रस्त खेळाडूंनी लवकर संघात परतणे गरजेचे आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh does not believe that india will win the 2023 odi world cup told where he is missing avw