Yuvraj Singh Father Yograj Singh Says Yuvi Bharat Ratna for playing with cancer : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा एमएस धोनीवर टीकास्त्र सोडले आहे. भारतासाठी सात सामने खेळलेल्या योगराज यांनी अनेक वेळा भारताचा माजी कर्णधार धोनीवर सार्वजनिक व्यासपीठावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा युवराजची कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. धोनीवर पुन्हा हल्लाबोल करत योगराज यांनी धोनीला आयुष्यात कधीही माफ करणार नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर युवराज सिंगला भारतरत्न दिला जावा, असेही म्हणाले.

‘धोनीने त्यांचे तोंड आरशात पाहावे’ –

झी स्विचच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना योगराज म्हणाले, “मी एमएस धोनीला माफ करणार नाही. धोनीने त्यांचे तोंड आरशात पाहावे. तो खूप मोठा क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध जे काय केले, हे आता समोर येत आहे. त्याला आयुष्यात कधीच माफ करता येऊ शकत नाही. मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही. दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असो किंवा माझी मुले.”

‘युवराजला भारतरत्न मिळायला हवा’-

योगराज सिंग यांनी आपला मुलगा भारतरत्नसाठी पात्र असल्याचे सांगितले. योगराज पुढे म्हणाले, “त्या माणसाने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. युवी अजून चार-पाच वर्षे खेळू शकला असता. मी सर्वांना आव्हान करतो की युवराजसारखा मुलगा घडवा. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही युवराज सिंगसारखा दुसरा खेळाडू कधीच होणार नाही असे म्हटले आहे. कर्करोगाशी झुंज देत देशासाठी विश्वचषक जिंकल्याबद्दल भारताने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला पाहिजे.”

हेही वाचा – Gautam Gambhir : गौतम गंभीरने निवडली भारताची ऑल टाईम इलेव्हन, रोहितसह ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाले स्थान?

भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात युवराज सिंगचे मोलाचे योगदान –

२००७ आणि २०११ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या अष्टपैलू खेळाडूने २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती, ज्यामुळे भारतीय फलंदाजी मधल्या फळीत मजबूत झाली होती. २०११ मध्ये भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयात युवराजला बॅट आणि बॉलने केलेल्या अष्टपैलू योगदानासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. ज्यानंतर युवराज एकदिवसीय विश्वचषकादरम्यान कर्करोगाशी झुंज देत असल्याचे समोर आले.