Yograj Singh Wanted to Put Bullet Through Kapil dev’s Head: टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. योगराज सिंह हे पोडकास्ट आणि मुलाखतींमध्ये बोलताना अनेकदा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही आठवणी सांगत असतात. दरम्यान त्यांचा कपिल देव यांच्यावरील राग आणि त्यांच्यातील वाद हा त्यांनी अनेकदा खुलेपणानं बोलूनही दाखवला आहे. आता त्यांनी कपिल देव यांना गोळी घालणार होतो असल्याची घटना सांगितली आहे.
युवराजचे वडील योगराज यांनी सांगितले की, एकदा ते रागाच्या भरात कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, कपिल देव यांच्या आईमुळे त्यांनी तसे केले नाही. यानंतर ते कपिल देव यांच्या घरातून परतले. पण नेमकी घटना काय घडली होती, याचा आढावा.
हेही वाचा – Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
अनफिल्टर्ड बाय समीदश या पोडकास्टमध्ये बोलताना योगराज सिंह म्हणाला, ‘जेव्हा कपिल देवला भारत, नॉर्थ झोन आणि हरियाणाचे कर्णधार मिळाले, तेव्हा त्यांनी मला कोणतेही कारण नसताना संघातून वगळले. मी कपिलला प्रश्न विचारावेत अशी माझ्या पत्नीची इच्छा होती. मी तिला म्हणालो, ‘मी या माणसाला धडा शिकवीन.’ मी माझं पिस्तूल काढलं आणि सेक्टर ९ मधील कपिलच्या घरी गेलो. तो आईबरोबर घराबाहेर आला. मी त्याला खूप घालून पाडून बोललो, शिवीगाळ केली. मी त्याला म्हणालो, ‘तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला आहे, आणि तू जे केले आहेस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल’.
योगराज यांनी पुढे सांगितले की, कपिल देव यांच्या आईमुळे त्यांनी गोळी झाडली नाही. योगराज पुढे म्हणाले, ‘मी त्याला (कपिलला) सांगितले होते की, ‘मला तुझ्या डोक्यात गोळी झाडायची आहे, पण मी तसं करणार नाही कारण तुझी आई आहे, जी येथे उभी आहे’. मग मी पत्नीला म्हटलं इथून निघूया आणि तेव्हाच ठरवलं की मी क्रिकेट खेळणार नाही, युवी क्रिकेट खेळेल.
योगराज सिंह यांनी इतकंही सांगितलं की ते इतक्या वर्षांमध्ये कपिल देव यांच्याबरोबर बोलले नाहीत. याबाबत सांगताना ते म्हणाले, २०११ मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा एक व्यक्ती होता जो रडत होता आणि तो म्हणजे कपिल देव. युवराज सिंहने वर्ल्डकपमध्ये त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी केली होती, असा वृत्तपत्राचा कटआऊट मी त्याला पाठवला होता.
हेही वाचा – Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
योगराज सिंह यांची क्रिकेट कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते पण त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यांची कारकीर्द केवळ ७ सामन्यांपुरती मर्यादित राहिली. भारताकडून एक कसोटी खेळताना त्यांनी एक विकेट घेतली. योगराज यांनी सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ विकेट घेतले. त्यांनी १९८० मध्ये एकदिवसीय आणि १९८१ मध्ये कसोटी पदार्पण केले.