भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील नियमित कर्णधार असलेला रोहित शर्मा आता ३७ वर्षांचा आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक हा रोहितचा अखेरचा वर्ल्डकप असल्याचे म्हटले जात आहे. पण यावर माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच म्हणणं वेगळं आहे, त्यांच्यामते रोहित शर्मा हा ५०वर्षांचा होईपर्यंत क्रिकेट खेळू शकतो. इतकंच नव्हे तर योगराज सिंह यांनी बीसीसीआयला सुचवले की खेळाडू जर फिट आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत त्याला खेळण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. रोहितबद्दल योगराज सिंह नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
आयपीएल २०२४ च्या हंगामादरम्यान स्पोर्ट्स-18 शी बोलताना युवराजचे वडील योगराज सिंग म्हणाले, “वय ही फक्त एक संख्या आहे, जी खेळाडू किती वर्षांचा आहे हे दर्शवते. पण मला हे समजत नाही की जर एखादा खेळाडू ४०, ४२ किंवा ४५ व्या वर्षीही तंदुरुस्त असेल आणि चांगली कामगिरी करत असेल तर त्यात चुकीचे काय आहे. आपल्या देशात लोकांचा असा विश्वास आहे की तुम्ही ४० वर्षांचे झाले की म्हातारे होता. पण सत्य हे आहे की तुम्ही संपलेले नसता.”
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
पुढे सांगताना माजी क्रिकेटरचे उदाहरण देत योगराज सिंग म्हणाले, “मोहिंदर अमरनाथ ३८ वर्षांचे असताना त्यांनी भारताला विश्वचषक जिंकून दिला. अंतिम सामन्यातही ते सामनावीर ठरले. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वयाचा घटक काढून टाकला पाहिजे असे मला वाटते. रोहित आणि सेहवाग हे दोन महान खेळाडू आहेत ज्यांनी फिटनेस आणि ट्रेनिंगचा कधीच विचार केला नाही आणि त्यांना हवे असल्यास ते वयाच्या पन्नाशीपर्यंत क्रिकेट खेळू शकतात.”
हेही वाचा – ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी आठ टी-२० विश्वचषक आणि तीन एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत. पण टीम इंडियाला त्यांच्या कार्यकाळात एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे, रोहित शर्माला आता जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी भारतासाठी जिंकून २०१३ पासून सुरू असलेला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे. रोहितने आतापर्यंत ५९ कसोटी सामन्यांमध्ये ४१३७ धावा, २६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,७०९ धावा आणि १५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९७४ धावा केल्या आहेत.