बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर आज क्रिकेटप्रेमींना जुन्या युवराज सिंहचं दर्शन झालं. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या युवराजने छोटेखानी खेळीमध्ये प्रेक्षकांनी मनं जिंकली. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मुंबईने 187 धावांपर्यंत मजल मारली. युवराजने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर लागोपाठ 3 षटकार खेचत सर्वांची वाहवा मिळवली. युवराजचा आक्रमक अवतार पाहून तो आज परत 6 षटकार खेचतो का असं वाटायला लागलं होतं. मात्र चहलला सलग चौथा षटकार खेचण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याच्या या खेळीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
6, 6, 6 & Out – Vintage Yuvraj recreates old magic https://t.co/k3aH9oRwih
— Sports Freak (@SPOVDO) March 28, 2019
आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिल्या सामन्यातही युवराज सिंहने अर्धशतकी खेळी केली होती. मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याला आपल्या संघाला विजयपथावर नेता आलं नाही. मात्र बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळी करत युवराजने आपल्यातला फलंदाज अजुनही बाकी असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये युवराज मुंबईकडून कसा खेळ करतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.