पहिला ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे वाहून गेल्याने दुसऱ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आर या पारची लढाई पाहायला मिळेल. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी हा एकमेव सामना दोन्ही संघांना खेळायला मिळणार असून हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करतील. पहिल्या सामन्यात युवराज सिंगच्या पुनरागमनावर साऱ्यांच्याच नजरा होत्या. पहिल्या सामन्यात खेळ न झाल्याने या सामन्यात त्याचे पुनरागमन पाहण्यासाठी त्याचे चाहते आसुसलेले असतील.
चेन्नईची खेळपट्टी फिरकीला साजेशी समजली जात असली तरी संघातील नेमक्या कोणत्या फिरकीपटूला संधी द्यायची हे मोठे कोडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीपुढे असेल. हरभजन सिंग, आर. अश्विन आणि पीयूष चावला यांच्यातील दोघांची निवड धोनीला करावी लागणार आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये लक्ष्मीपती बालाजीला संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तर फलंदाजीमध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांना सूर सापडतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
जेकब ओरम आणि डॅनियल व्हेटोरी या दोघांचा न्यूझीलंडच्या संघातील समावेशाने त्यांचे पारडे नक्कीच जड झाले असेल.
आतापर्यंतच्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ भारतावर वरचढ राहिलेला आहे, भारतीय संघ घरच्या मैदानात हे समीकरण मोडीत काढते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, आर. अश्विन, झहीर खान, लक्ष्मीपती बालाजी, अशोक दिंडा, पीयूष चावला आणि मनोज तिवारी.
न्यूझीलंड : रॉस टेलर (कर्णधार), ब्रेन्डन मॅक्क्युलम, नॅथन मॅक्क्युलम, मार्टिन गप्तील, केन विल्यमसन, डॅनियल व्हेटोरी, टीम साऊथी, अ‍ॅडम मिल्ने, रोनी हिरा, कायले मिल्स आणि बी.जे. वॉल्टिंग.
सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ पासून. थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट वाहिनीवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा